- उजमा शेख पुणे : एक कप कॉफी किंवा चहामध्ये किती चमचे साखर, दूध टाकायचे? अशा जीवनातील साध्या दैनंदिन गोष्टी सहज सोप्या पद्धतीने गणिताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यासाठी ‘एनसीईआरटी’ने इयत्ता ८ वी साठी खास ‘गणित प्रकाश’ पाठ्यपुस्तक तयार केले आहे.नवीन शैक्षणिक वर्ष २०२५ ‘एनसीईआरटी’ने तयार केलेल्या इयत्ता ८ वीच्या गणित विषयासाठी ‘गणित प्रकाश’ भाग १ हे पाठ्यपुस्तक विशेष चर्चेत आहे. पुस्तकात गणितीय संकल्पना शिकवताना केवळ उदाहरणे न देता, त्या प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितीशी जोडण्यावर भर दिला आहे. ‘एक कप कॉफी किंवा चहा बनवण्यात कोणते गणित दडले आहे?’ अशा प्रश्नांपासून ते प्राचीन गणितज्ज्ञ आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त यांच्या योगदानापर्यंत विविध गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (एनईपी) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट २०२३ (एनसीएफ- एसई) यांच्या आधारावर इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी नवी पाठ्यपुस्तके प्रकाशित केली आहेत. नवीन पाठ्यपुस्तकात सुताराच्या साधनांपासून खेळांपर्यंत गणिताचा उपयोग कसा होतो? हे उदाहरणांसह स्पष्ट केले आहे. तसेच ‘चंद्रावर पोहोचण्यासाठी कागद किती वेळा दुमडावा लागेल?’ अशा काल्पनिक आणि रोचक प्रश्नांनी विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रसिद्ध १७२९ या ‘हार्डी-रामानुजन’ संख्येचा उल्लेख करून गणितातील नमुन्यांचा शोध घेण्यास प्रोत्साहन दिले आहे. फक्त १० अंकांत कितीही मोठी संख्या दर्शवता येते, हे दाखवून हिंदू संख्या प्रणाली आणि शून्याचे महत्त्व समजावून सांगितले आहे.पुस्तकात ‘?’ हे चिन्ह ठळक प्रश्न दर्शवण्यासाठी वापरले असून, यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः विचार करून उत्तर शोधण्याची प्रेरणा मिळते. अभ्यास मजेदार करण्यासाठी प्रत्येक विभागात कोडी, खेळ आणि उपक्रमांचा समावेश आहे. रंगीत चित्रे आणि कॉमिक्समुळे संकल्पना अधिक सोप्या व आकर्षक बनवल्या आहेत. शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शक विभाग दिला असून, त्यामुळे हे पुस्तक वर्गात परिणामकारक पद्धतीने वापरता येईल.शिक्षकांच्या मते, या नव्या पद्धतीमुळे गणित फक्त परीक्षेसाठी न शिकता, विद्यार्थी ते जीवनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून अनुभवतील. पालकांच्या दृष्टीने, ही पद्धत मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन टीकात्मक विचारसरणी विकसित करेल. ‘गणित प्रकाश’ हे केवळ अभ्यासक्रमाचा भाग नसून, विद्यार्थ्यांना जगाकडे गणिताच्या नजरेतून पाहायला शिकवणारे एक प्रभावी साधन ठरणार आहे.
‘एक कप कॉफी किंवा चहात किती चमचे साखर टाकावी’ या दैनंदिन गोष्टीही आता गणितातून शिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:13 IST