सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात 'नमस्कार रसिकहो', 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:09 IST2025-12-10T13:09:11+5:302025-12-10T13:09:43+5:30
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सलग ३३ वर्षे आनंद देशमुख यांनी केलेल्या निवेदनाची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये होणार नोंद

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात 'नमस्कार रसिकहो', 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये जाणार
पुणे : ‘नमस्कार रसिकहो!’ सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या’ स्वरयज्ञास प्रारंभ होण्यापूर्वी अत्यंत मृदू भाषेत हे दोन शब्द रसिकांच्या कानी पडतात आणि अभिजात संगीताच्या सप्त सुरांची लय जणू आसमंतात हळूवारपणे मिसळत जाते. गेली सलग ३३ वर्षे महोत्सवात निवेदनाची सेवा देणं हा अभिजात संगीताच्या क्षेत्रातील एक उच्चांक आहे. याच विक्रमाची नोंद लंडन येथील ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
येत्या शनिवारी (दि. १३) प्रत्यक्ष सवाई महोत्सवात ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या संस्थेचे प्रतिनिधी विक्रम त्रिवेदी यांच्या हस्ते ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख यांचा सन्मान केला जाणार आहे. या अखंड निवेदनाची सेवा देणाऱ्या विक्रमावर एकप्रकारे शिक्कामोर्तब होणार असून, या अभूतपूर्व सोहळ्याचे हजारो पुणेकर साक्षीदार होणार आहेत.
लंडन येथील बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थेने सूत्रसंचालन / निवेदन या क्षेत्राला जागतिक विक्रमाच्या यादीत समाविष्ट केल्याबद्दल संस्थेचा मी ऋणी आहे, अशी भावना आनंद देशमुख यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मी खूप आनंदात आहे. हा सन्मान आपल्या अभिजात संगीताचा, आर्य संगीत प्रसारक मंडळाचा, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा, असंख्य समर्पित स्वयंसेवकांचा, संगीत समीक्षक आणि वार्ताहरांचा, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायक, वादक, नर्तक आणि त्यांना साथ करणाऱ्या कलाकारांचा, सर्व निवेदक मित्रांचा आणि सर्वात शेवटी माझ्यावर अलोट प्रेम करणाऱ्या, मला शुभेच्छा आणि ऊर्जा देणाऱ्या माझ्या रसिकांचा हा सन्मान आहे!! त्या सर्वांच्या पुढे मी नतमस्तक आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षी होण्यासाठी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात जरूर या असे आवाहनही त्यांनी केले.