मतासाठी बहीण लाडकी झाली, आम्ही संशाेधक कधी लाडके हाेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:04 IST2025-09-18T14:03:06+5:302025-09-18T14:04:05+5:30

- संशाेधक विद्यार्थ्यांचा सवाल; दिवस-रात्र अन् ऊन पावसातही आंदाेलन सुरूच

pune news my sister became beloved for her votes, when will we, the editors, be beloved | मतासाठी बहीण लाडकी झाली, आम्ही संशाेधक कधी लाडके हाेणार?

मतासाठी बहीण लाडकी झाली, आम्ही संशाेधक कधी लाडके हाेणार?

पुणे : ‘दिवस असाे की रात्र, ऊन असाे की पाऊस’ या कशाचीही तमा न बाळगता जिजाऊ-सावित्री-रमाई यांच्या लेकी पुण्यात आंदाेलन करीत आहे. डेक्कन येथील गुडलक चाैकात कलाकार कट्ट्यावर हे आंदाेलन सुरू आहे. मतासाठी बहीण लाडकी झाली, आम्ही संशाेधक कधी लाडके हाेणार, असा प्रश्न त्या विचारत आहेत.

भर चाैकात, उघड्यावर आणि अंगावर पाऊस झेलत त्यांना रात्र काढावी लागत आहे. तरीही सरकारला पाझर फुटत नाही. राज्याच्या कानाकाेपऱ्यातून आलेल्या या संशाेधक मुलींची व्यथा जाणून घेतली तर अंगावर काटा उभा राहताे. बहुतांश विद्यार्थ्यांचे वडील शेतकरी. नुकतेच आभाळ फाटले आणि शेतीचे अताेनात नुकसान झाले. त्यामुळे या मुलींवर आणि कुटुंबावर ओढवलेले संकट भीषण आहे. संशाेधक विद्यार्थी देखील या लढ्यात आहेत.

सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, आर्टी या सर्व संस्थांच्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध कराव्यात, नोंदणी दिनांकापासून सरसकट शिष्यवृत्ती जाहीर करावी, संपूर्ण निवड प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करावी, शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी, स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करून सरसकट फेलोशिप लागू करावी, संपूर्ण निवड प्रक्रिया एका महिन्यात तत्काळ पूर्ण करावी, थकीत व प्रलंबित फेलोशिप तातडीने वितरित करावी, अमृत संस्थेंतर्गत लिंगायत विद्यार्थ्यांना त्वरित समाविष्ट करावे, या प्रमुख मागण्यांसाठी मागील तीन दिवसांपासून हे आंदाेलन सुरू आहे. दयानंद पवार या आंदाेलक विद्यार्थ्याने तर तीन दिवसांपासून अन्नाचा घास घेतला नाही. त्यामुळे त्याची प्रकृती खालावत आहे. सरकारने वेळीच दखल घेऊन न्याय द्यावा, अशी विनंती करीत आहेत.

आंदाेलनाचा तिसरा दिवस असल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळत आहे. सरकारने वेळीच दखल घेणे आवश्यक आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर, काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माेहन जाेशी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दर्शविला असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आले. इतर संस्था-संघटनांचाही पाठिंबा वाढत आहे. 

इकडे आड, तिकडे विहीर..!

याबाबत राहुरी येथील कृषी विद्यापीठात संशाेधन करीत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी परिमल कुंभार ही मूळची सातारा जिल्ह्यातील. वडील शेतकरी. संशाेधक हाेण्याचे स्वप्न उरी बाळगून मी शिक्षणासाठी घराबाहेर पडले. महाज्योती संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळेल आणि माझे संशाेधन पूर्ण हाेईल, अशी आशा आहे. पण, द्वितीय वर्ष सुरू झालं तरी अद्याप फाॅर्म निघाले नाहीत. गावी पावसाने शेतीचे अताेनात नुकसान केले. त्यामुळे आमची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी झाली आहे. सरकारने तत्काळ कार्यवाही करावी, हीच माफक अपेक्षा आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.

...तर शिक्षणच थांबेल !

परभणी कृषी विद्यापीठात संशाेधन करीत असलेली मूळची बुलढाणा जिल्ह्यातील प्रियंका इंगळे ही विद्यार्थिनी सध्या बारामती येथे संशाेधन करीत आहे. मागील तीन दिवसांपासून न्याय हक्कासाठी आंदाेलन करीत आहे. वडील सामान्य शेतकरी, त्यामुळे आधीच आर्थिक स्थिती बेताची त्यात आम्हाला उच्च शिक्षणासाठी ते पैसे कुठून देणार. वेळीच शिष्यवृत्ती मिळाली नाही तर आमचं शिक्षण थांबेल, अशी भीती या विद्यार्थिनीने व्यक्त केली.

करायचे आहे संशाेधन, करावे लागतेय आंदाेलन..!

मूळची हिंगोली येथील संगीता मगर ही देखील राहुरी कृषी विद्यापीठातील संशाेधक विद्यार्थिनी. शेतकरी कन्या. सारथी संस्थेची शिष्यवृत्ती मिळेल आणि त्या आधारे आपण संशाेधन पूर्ण करू, या अपेक्षेने तिने प्रवेश घेतला, पण प्रत्यक्षात शिष्यवृत्ती मिळणे दूरच, त्यासाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली नाही. हीच अवस्था पुणे कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पूजा दुर्गावले हिची आहे. ती मूळची सांगलीची. वडील शेतकरी. सारथी संस्थेची शिष्यवृत्ती मिळेल या विश्वासाने पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळवलेला. प्रत्यक्षात निराशा आली आणि संशाेधन करण्यापूर्वी आंदाेलन करण्याची वेळ या मुलींवर आली.
 

मी मूळची बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याची मुलगी. कृषी विद्यापीठ राहुरी येथे संशाेधन करीत आहे. यंदा प्रथम वर्षात असून, सारथी संस्थेकडून वेळेत शिष्यवृत्ती मिळाली तर मी शिक्षण पूर्ण करू शकणार आहे. तरी सरकारने वेळीच आमच्या मागणीची दखल घेऊन न्याय द्यावा, ही विनंती. - निकिता नेटके, संशाेधक विद्यार्थिनी  
 

सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत आणि आर्टी या संस्था शिष्यवृत्तीची जाहिरात वेळेत न काढता, हाेईल तितका विलंब लावत आहे मला शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून दिवस-रात्र आंदोलन करावे लागत आहे.  - अंकुश चौघुले, संशाेधक
 

बेमुदत उपोषणाचा बुधवारी तिसरा दिवस उजाडला. तरीही काेणी दखल घेत नाही. आम्हाला न्याय मिळत नाही. स्कील डेव्हलपमेंट कोर्सेस चालवायचे आहेत, असे सांगून आम्हा संशोधक विद्यार्थ्याला डावलले जात आहे. सरकारने पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करावी आणि सरसकट शिष्यवृत्ती देण्याचे मान्य करावे, तरच आम्ही आंदोलन थांबवू  - दयानंद पवार, अन्नत्याग केलेला आंदाेलक विद्यार्थी 
 


राज्य सरकारने जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा ताे पैसा संशोधनासाठी खर्च करावा. संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देऊन सहकार्य करावे. जेणेकरून खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल. - अरुण मते, संशोधक विद्यार्थी


या आंदोलनात परभणी, राहुरी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला आदी भागांतून विद्यार्थी सहभागी झाले आहेत. संकटांना न घाबरता संघर्षाची जिद्द कायम राखली आहे. भरपावसातही विद्यार्थ्यांचा निर्धार कायम आहे. या संशाेधक विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी रस्त्यावर येण्याची वेळ सरकारने आणली आहे. सरकारने लवकरात लवकर मागण्यांचा सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा.  - नितीन आंधळे, आंदोलक विद्यार्थी 

Web Title: pune news my sister became beloved for her votes, when will we, the editors, be beloved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.