पुणे : केशवनगर व मुंढवा परिसरात नदीपात्रात अनधिकृतपणे राडारोडा टाकला जात असताना महापालिका प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने नुकतेच प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर जागे झालेल्या प्रशासनाने नदीपात्रात राडारोडा टाकण्यासाठी आलेला ट्रॅक्टर पकडला असून त्याच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेने संगमवाडी ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा या दरम्यान दोन टप्प्यामध्ये मुळा-मुठा नदीचे सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प मुंढवा पुलाच्या पश्चिम बाजूस असताना पुलाच्या पूर्वेस प्रकल्पाचे काम सुरू नसतानाही या प्रकल्पाच्या आडून मुंढवा स्मशानभूमीजवळ नदीपात्रात शेकडो ट्रक राडारोडा टाकण्यात आला आहे. या ठिकाणी हजार ते बाराशे ट्रक राडारोडा टाकून पुलाच्या उंचीएवढा पट्टा तयार करण्यात आला आहे. नदी सुशोभीकरणाचे काम आणि येथील राडारोडा यामधील फरक रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या सहज लक्षात येतो. असे असताना हा प्रकार व्हिजिटच्या नावाखाली कार्यालयाबाहेर फिरणाऱ्या महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र दिसला नाही.
यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्याबरोबर प्रशासनाला खडबडून जागे झाले. महापालिका आयुक्तांनी विभाग प्रमुखांना बोलावून या राडारोड्याबद्दल प्रश्नांची सरबत्ती करत फैलावर घेत कानउघाडणी केली. त्यानंतर बांधकाम विभाग, हडपसर क्षेत्रीय कार्यालय आणि नदी सुधार प्रकल्पाच्या पथकाने जागा पाहणी करून प्राथमिक अहवाल आपापल्या वरिष्ठांना सादर केला.
दरम्यान, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन सीसीटीव्हीच्या आधारे राडारोडा टाकणाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंढवा चौकात सीसीटीव्ही नेमका राडारोडा कोण टाकते, हे तपासणे शक्य होत नव्हते. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाने या ठिकाणी टेहळणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. अखेर शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास नदीपात्रात राडारोडा टाकण्यासाठी आलेला एक ट्रॅक्टर आरोग्य निरीक्षक व सहायकाच्या जाळ्यात अडकला. हा ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चालक थावारू उमलू नायक (४९, रा. म्हाडा कॉलनी, विमान नगर) यांच्याविरोधात आरोग्य निरीक्षक संतोष ताटकर यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
मुंढवा स्मशानभूमीजवळ यापूर्वीही राडारोडा टाकण्यात येत होता. त्यावेळी कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना तेथील एका व्यक्तीने ही जागा माझी आहे, असे म्हणत दमदाटी केली होती. भीतीपोटी अधिकारी व कर्मचारी रिकाम्या हाताने परत आले. त्यानंतर प्रशासनाने जवळपास १०० ट्रक राडारोडा उचलला होता. त्यानंतर याठिकाणी पुन्हा राडारोडा टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.