पुणे : महापालिकेच्या धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय (शाळा क्रमांक १७) येथील तब्बल २ लाख ५३ हजार ४८० रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीज जोड तोडले आहे. शाळेच्या शेजारीच असलेल्या अनधिकृत व्यायामशाळा व अभ्यासिकेच्या अनधिकृत वीजजोडकडे महापालिका अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याने शाळेवर ही वेळ आल्याचा आरोप उद्धव सेनेचे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत यांनी केला आहे.
धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय (शाळा क्रमांक १७) येथे जुनी इमारत आणि नवीन इमारत अशा दोन इमारती आहेत. जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील दोन वर्ग धोकादायक आहेत, असे दाखवून नवीन इमारतीच्या तळमजल्यावरील हॉलमध्ये पत्र्याचे दुभाजक (पार्टीशन) करून तीन वर्ग भरविले जात आहेत. तर नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अभ्यासिका व दुसऱ्या मजल्यावर व्यायामशाळा आहे. विशेष म्हणजे, जुन्या इमारतीमधील जे दोन वर्ग धोकादायक म्हणून मोकळे करण्यात आले होते. तेथे दुसरी एक नव्याने अभ्यासिका तयार करण्यात आली आहे.
दरम्यान, नवीन इमारतीमधील व्यायामशाळा व अभ्यासिका भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने अनधिकृतपणे सुरू केल्याचा आरोप उद्धव सेनेचे अनंत घरत आणि काॅंग्रेसचे सागर धाडवे यांनी केला. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर ती महापालिकेकडे हस्तांतरित होणे गरजेचे होते. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून संबंधित पदाधिकारी या मिळकती स्वत:च्या ताब्यात ठेवून तेथे व्यायमशाळा व अभ्यासिका चालवत आहे. या ठिकाणी जोडण्यात आलेले वीज कनेक्शन बेकायदेशीरपणे शाळेच्या मीटरमधील जोडण्यात आल्याचा आरोप करत घरत व धाडवे यांनी महावितरणकडे तक्रार केली होती. त्यानंतर महावितरणने २ लाख ५३ हजार ४८० रुपयांचे बिल शाळेला आकारले होते. हे बिल भरले गेले नाही. त्यामुळे महावितरणने १३ ऑगस्ट रोजी शाळेचे वीज जोड तोडल्याचे घरत यांनी सांगितले.
सदर शाळेच्या वीज बिलाची थकीत रक्कम दाेन लाख रुपये इतकी आहे. या ठिकाणी असलेल्या अभ्यासिकेचा वापर व्यावसायिक हाेत असल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे. ही अभ्यासिका माेफत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे महावितरणला कळविले आहे. - मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, पुणे महापालिका.