विमानतळाच्या भूसंपादनासाठी ६२ टक्क्यांहून अधिक जमिनीची संमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 12:31 IST2025-09-09T12:24:44+5:302025-09-09T12:31:22+5:30

- १६०० शेतकऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला पत्र, १५ दिवसांतच प्रतिसाद, १८ सप्टेंबरपर्यंत मुदत

pune news More than 62 percent land consent for purandar airport land acquisition | विमानतळाच्या भूसंपादनासाठी ६२ टक्क्यांहून अधिक जमिनीची संमती

विमानतळाच्या भूसंपादनासाठी ६२ टक्क्यांहून अधिक जमिनीची संमती

पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी ६२ टक्क्यांहून अधिक जमिनीची संमती दिली आहे. गेल्या १५ दिवसांत संपादन होत असलेल्या ७ गावांमधील १ हजार ६०० शेतकऱ्यांनी आतापर्यंत १ हजार ७५० एकर क्षेत्रासाठी संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहेत. त्यातील मुंजवडी गावातील सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिलेली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र २ हजार ६७३ इतके होते. आता त्यात १ हजार ३८८ हेक्टरची कपात करून हे क्षेत्र १ हजार २८५ हेक्टर करण्यात आले आहे. भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडून २६ आॉगस्टपासून संमतीपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली. मुंजवडी या गावातील सुमारे ७६ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून आतापर्यंत ७० हेक्टर क्षेत्राची संमतीपत्रे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहेत आहे. संमतीपत्रे देण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ७५० एकर क्षेत्र ताब्यात घेण्यास प्रशासनाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे भूसंपादित करण्यात येणाऱ्या एकूण क्षेत्राच्या ६२ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी संमतीपत्रे सादर केली आहेत.

- एकूण संपादन क्षेत्र - सुमारे तीन हजार एकर

- संमतीपत्र दिलेले क्षेत्र - सुमारे १ हजार ७५० एकर

- मुंजवडी येथील ९० टक्के शेतकऱ्यांची संमतीपत्रे सादर

Web Title: pune news More than 62 percent land consent for purandar airport land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.