‘लालपरी’ला पावली लक्ष्मी; ११ दिवसांत २३ कोटींहून अधिक उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:38 IST2025-10-29T17:37:47+5:302025-10-29T17:38:00+5:30
- २० हजारांहून अधिक फेऱ्या; यंदा सव्वा पाच कोटी जास्त महसूल

‘लालपरी’ला पावली लक्ष्मी; ११ दिवसांत २३ कोटींहून अधिक उत्पन्न
पुणे : दिवाळीत गावी जाणाऱ्या आणि माघारी येणाऱ्या नागरिकांसाठी पुणे एसटी विभागाने १७ ते २७ ऑक्टोबरदरम्यान अतिरिक्त बस सोडल्या होत्या. या ११ दिवसांत एसटीच्या २० हजारांहून अधिक फेऱ्या झाल्या असून, यांतून १७ लाख ६२ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला आहे.
या काळात पुणे एसटी विभागाला २३ कोटी ३९ लाख रुपये महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या ११ दिवसांतील फेऱ्यांमुळे यंदा सव्वापाच कोटी रुपये अधिक महसूल नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
नोकरी, व्यवसाय आणि इतर कामांनिमित्त पुण्यात राज्य आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवाळीला गावी जाऊन सण साजरा करणाऱ्यांची संख्या लाखोंची आहे. त्यामुळे एसटी विभागाने विदर्भ, मराठवाडा, खान्देश व कोकण भागांसह स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड या आगारांतून अतिरिक्त बससेवा चालवली.
विशेषतः पुण्यातून विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारांतून दररोज सहा हजारांहून अधिक अतिरिक्त बस राबवण्यात आल्या. याचा एसटी महामंडळाला फायदा झाला असून, त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा पाच कोटी रुपये जास्त महसूल मिळाला आहे.
११ दिवसांत २० हजारांहून अधिक फेऱ्या
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण बसफेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: मराठवाडा भागात गेल्या वर्षी ११ दिवसांत तीन हजार फेऱ्या झाल्या होत्या, तर यंदा चार हजार ५०० फेऱ्या राबवल्या गेल्या आहेत. तसेच विदर्भ आणि खान्देश भागांतही फेऱ्यांमध्ये वाढ दिसून आली आहे. या ११ दिवसांत एकूण १७ लाखांहून अधिक नागरिकांनी लालपरीच्या सेवांचा लाभ घेतला आहे.