कर्नलवाडी, गुळूंचे गावात हैदोस घालणाऱ्या माकडांमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:15 IST2025-07-16T12:15:00+5:302025-07-16T12:15:20+5:30

३० ते ४० माकडांचा कळप शेतातील भुईमूग, डाळिंब, मिरची, चवळीच्या शेंगा, फळबागेचे नुकसान करीत आहेत. यामुळे शेतकरी धास्तावला आहेत

pune news monkeys wreak havoc in Karnalwadi, Gulunche villages, endangering the lives of citizens | कर्नलवाडी, गुळूंचे गावात हैदोस घालणाऱ्या माकडांमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीस

कर्नलवाडी, गुळूंचे गावात हैदोस घालणाऱ्या माकडांमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीस

नीरा : कर्नलवाडी व गुळुंचे (ता. पुरंदर) येथे गावांत हैदोस घालणाऱ्या माकडांच्या टोळीमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांसह महिलावर्ग सर्वाधिक त्रस्त झाले आहेत. ३० ते ४० माकडांचा कळप शेतातील भुईमूग, डाळिंब, मिरची, चवळीच्या शेंगा, फळबागेचे नुकसान करीत आहेत. यामुळे शेतकरी धास्तावला आहेत, तर कार्यक्रमाच्या निमित्ताने दारापुढे टाकलेला मंडपाचे छत एका क्षणात चिरफाड केल्याने मंडप व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. गुळुंचे कर्नलवाडी गावच्या लोकवस्तीत माकडांच्या कळपांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. माकडांच्या झुंडी घरांवर उड्या मारत असल्याने कौलारू तसेच सिमेंटच्या पत्र्यांच्या घरांची मोठी नासधूस करीत असल्याने वनविभागाने या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

कर्नलवाडी परिसरामध्ये गेले अनेक दिवसांपासून माकडांनी आपला मोर्चा शेतांमध्ये वळविला आहे. पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी माकडांना शेतातून पिटाळून लावतात. परिणामी, माकडांनी आपला मोर्चा गावाकडे वळविला आहे. यामुळे गावात माकडांचा उच्छाद वाढल्याचे दिसून येत आहे. शेतशिवारालगत माकडांचा धुमाकूळ सुरू असून या घरावरून त्या घरावर माकडांच्या झुंडी उड्या मारत असल्याने बहुतांश घरांचे कौले फुटून त्याचप्रमाणे सिमेंटचे पत्रे फुटतात. विजेच्या तारा, गच्चीत ठेवलेले साहित्य, पाण्याच्या टाक्या, झाडांच्या कुंड्या, घरावरील सोलारचे पाइप आदींचे अतोनात नुकसान करीत आहेत.

माकडे रात्रीच्या वेळी काही घरांच्या छतावर मुक्काम करीत असल्याने छतावर जाणे अथवा फिरणेही धोकादायक झाले आहे. या माकडांच्या वनविभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कुणीही या तक्रारींची दखल घेत बंदोबस्त करायला तयार नाहीत. या माकडांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला असता ते चवताळतात. त्यामुळे शेतकऱ्यांसह महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने या माकडांना पकडून जंगलात सोडणे गरजेचे असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. ३०-४० माकडांच्या या कळपाने नागरिक त्रस्त झाले आहेत. माकडांची ही टोळी असल्याने आवाज केला तरी ती घाबरत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या माकडांच्या बंदोबस्ताची मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पृथ्वीराज निगडे यांनी पुरंदरच्या वनविभागाकडे केली आहे.

कर्नलवाडीत वन कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन सोमवारी पाहणी केली आहे. माकडे जास्त असल्याने पकडण्यासाठी वनविभागाला ते शक्य नाही. रेस्क्यू टिमला ही माकडे पकडायला सांगितले आहे. ही रेस्क्यू टीम माकडांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. रविवारी एका जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  - सागर ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी, सासवड 

Web Title: pune news monkeys wreak havoc in Karnalwadi, Gulunche villages, endangering the lives of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.