जिल्ह्यात ३५ हजार घरे बांधण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट, खेड मुळशीत १५ हजार घरे बांधण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:48 IST2025-09-12T12:48:02+5:302025-09-12T12:48:24+5:30

शिरूर येथेही ४ एकर जागेत नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली

pune news MHADA aims to build 35 thousand houses in the district, Khed Mulshi | जिल्ह्यात ३५ हजार घरे बांधण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट, खेड मुळशीत १५ हजार घरे बांधण्यात येणार

जिल्ह्यात ३५ हजार घरे बांधण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट, खेड मुळशीत १५ हजार घरे बांधण्यात येणार

पुणे : जिल्ह्यात म्हाडातर्फे ३५ हजार घरे बांधण्याचे नियोजन असून सुमारे १५ हजार घरांसाठी खेड आणि मुळशी तालुक्यात जमीन उपलब्ध झाली आहे. घरांसाठी सरकारी तसेच खासगी जागा घेऊन ही घरे बांधण्यात येणार आहे. पुणे शहराजवळील पाबळ येथे २५ एकर जागा उपलब्ध होणार असून, खराबवाडी येथील घरांसाठी आराखडा अंतिम करण्यात आला आहे. शिरूर येथेही ४ एकर जागेत नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. दरम्यान, म्हाळुंगे व ताथवडे येथील म्हाडाच्या योजनांमधील घरांच्या विक्रीबाबत खासगी यंत्रणेची मदत घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

म्हाडातर्फे ६ हजार १६८ घरांच्या सोडतीच्या प्रारंभावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “जिल्ह्यात ३५ हजार घरे बांधण्याचे नियोजन आहे. त्यात खेड तालुक्यातील रोहकल येथे ४० ते ४५ एकर जागा उपलब्ध झाली असून ९ ते १० हजार घरे बांधण्यात येणार आहेत. मुळशी तालुक्यातील नेरे येथे ८ ते ९ एकर जागा मिळाली असून त्याठिकाणी ५ हजार घरांचे नियोजन आहे. पाबळ ग्रामपंचायतीने २५ एकर जागा देण्याचे मान्य केले आहे, तर म्हाडाच्या मालकीच्या शिरूर येथील ४ एकर जागेवर नवीन योजना आणण्याचे नियोजन आहे. खराबवाडी येथे चाकण नगर परिषद हद्दीत करण्यात येणाऱ्या योजनेचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. भोर येथे १२ एकर खासगी जागा उपलब्ध असून बाजारभावाने मिळाल्यास म्हाडा ती खरेदी करण्यास तयार आहे. महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या हद्दीत परवडणाऱ्या दरात जागा उपलब्ध झाल्यासही ती खरेदी करण्यात येईल.”

दरम्यान, म्हाळुंगे येथील म्हाडाच्या योजनेतील घरे पडून आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना राबवूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी कबूल केले. या ठिकाणी रस्त्याची अडचण होती. आता ती दूर करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून येथील घरांच्या विक्रीसाठी खासगी यंत्रणांची मदत घेण्यात येणार आहे. सध्या येथील ५० घरे भाडेतत्त्वावर देण्यात आली आहेत, तर ताथवडे येथील जागेवरील पहिल्या फेजमधील ६८९ घरांपैकी २८ घरे अद्याप शिल्लक आहेत, तर फेज दोनमधील ७९२ घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू आहे. याची किंमत ७४ लाखांवरून ६८ लाख करण्यात आली आहे. याच ठिकाणी १० लाख चौरस फुटांवर व्यावसायिक गाळे काढण्यात येणार असून पुढील वर्षी जूनपर्यंत ते पूर्ण होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: pune news MHADA aims to build 35 thousand houses in the district, Khed Mulshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.