बारामती -मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर बारामतीकरांनी जल्लोष केला. शहरातील नगरपरिषद प्रशासनासमोर समाजबांधवांनी एकत्रित येत विजयोत्सव साजरा केला.‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा मराठा समाजबांधवांनी दिल्या.विजयोत्सवात महिलांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी एक मराठा लाख मराठा, आपण जिंकलो, भूमिका ठाम होती, शेवटी नियतीलाही झुकावे लागले असे संदेश देणारे घोषवाक्ये देण्यात आली. तसेच मनोज जरांगे यांचे छायाचित्र हातात घेत ते उंचावत समाजबांधवांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, जिजाऊ भवन येथे समाजबांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणाबाबत झालेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली.
एक मराठा लाख मराठा,आपण जिंकलो..! बारामतीत मराठा समाज बांधवांचा विजयी जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 20:28 IST