महापालिका प्रशासनाशी मांडव व्यावसायिकांचे लागेबांधे पुन्हा उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 09:47 IST2025-11-08T09:46:47+5:302025-11-08T09:47:02+5:30
- अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, फ्लेक्स कापून सांगाडे मात्र जागेवरच

महापालिका प्रशासनाशी मांडव व्यावसायिकांचे लागेबांधे पुन्हा उघड
पुणे : शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी महापालिकेने दिवाळीपूर्वी शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याची प्रभावी मोहीम हाती घेतली. मात्र, दिवाळीमध्ये आणि त्यानंतर ही कारवाई थंडावल्याने शहरात सर्वत्र फ्लेक्स दिसू लागले आहेत. अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केल्यानंतर लोखंडी आणि बांबूंचे सांगाडे जप्त करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी देऊनही अनेक ठिकाणी सांगाडे जागेवरच आहेत. यामुळे महापालिका प्रशासन आणि मांडव व्यावसायिकांचे लागेबांधे पुन्हा एकदा उजेडात आले असून, वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.
शहरात रस्त्यांवरील विद्युत खांब, पथदिवे, सिग्नलचे खांब, चाैकांसह सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स उभारले जातात. हे फ्लेक्स विविध कार्यक्रमांचे आयाेजन, वाढदिवस, सणांच्या शुभेच्छा यासाठी उभारले जातात. अनेक ठिकाणी हे फ्लेक्स धाेकादायक पद्धतीने उभारले जातात. आकाशचिन्ह विभागाकडून व अतिक्रमण विभागाकडून अशा अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली जाते. मात्र, राजकीय दबावामुळे प्रशासनाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते. या फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होतेच. शिवाय महापालिकेचे उत्पन्नही बुडत आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी दिवाळीपूर्वी शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरात सर्वत्र प्रभावीपणे कारवाई मोहीम राबवण्यात आली. अनधिकृत फ्लेक्सबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले; मात्र यातून राजकीय फ्लेक्सकडे दुर्लक्ष झाले. गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये केवळ खासगी कंपन्यांना लक्ष्य केले गेले. एकाही राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल झाला नाही; मात्र गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेमुळे राजकीय नेतेही धास्तावले होते. फ्लेक्स लावताना इतरवेळी कोणालाही न जुमानणारे नेते फ्लेक्स लावण्यापूर्वी आपल्या भागातील अधिकाऱ्यांच्या कानावर घालत होते. दिवाळीमध्ये वादविवाद नको आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून प्रशासनाने दिवाळीमध्ये फ्लेक्सवरील कारवाई थांबवली होती. दिवाळीनंतर ही कारवाई पुन्हा सुरू होणे गरजेचे होते. मात्र, ही कारवाई अद्यापही सुरू झालेली दिसत नाही. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स झळकत आहेत.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभाग व क्षेत्रीय कार्यालयांकडून अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली जाते. कारवाईदरम्यान केवळ फ्लेक्स कापून नेले जातात. त्यासाठी बांधलेले लोखंडी, बांबू किंवा वासा याचे सांगाडे मात्र जागेवरच ठेवले जातात. याच सांगाड्यावर पुन्हा दुसरा फ्लेक्स लावला जातो. सांगाडे जप्त केले तर मांडव व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. प्रशासन आणि मांडव व्यावसायिकांचे लागेबांधे असतात. त्यामुळे हे सांगाडे जागेवर ठेवण्यात येतात. या पार्श्वभूमीवर महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करताना लोखंडी, लाकडी सांगाडे जप्त करून ते नष्ट करण्याचे आदेश दिले होते.
सिंहगड रोड, सातारा रोड, वारजे आदींसह शहराच्या विविध भागात फ्लेक्स जप्त करून लोखंडी व लाकडी सांगाडे जागेवरच ठेवण्यात आले आहेत. पदपथांवरील अनधिकृत फ्लेक्समुळे नागरिकांना पदपथ सोडून रस्त्यांवरून चालावे लागते. आता महापालिकेने फ्लेक्सवर कारवाई केली आहे. मात्र, सांगाडे जागेवरच असल्याने नागरिकांचा त्रास मात्र कमी झालेला नाही.
अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करून त्यासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी व लाकडी सांगाडे जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणारे निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. - माधव जगताप, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका