महापारेषणच्या बिघाडाला महावितरणला फटका; ५२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:51 IST2025-07-08T16:50:22+5:302025-07-08T16:51:18+5:30
- दुरुस्तीकामामुळे हिंजवडी मेट्रो स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी

महापारेषणच्या बिघाडाला महावितरणला फटका; ५२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
पिंपरी : महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत हिंजवडी फेज-२ मेट्रो स्थानकाजवळ रविवारी (दि. ६) दुपारी सुमारे दोन वाजता बिघाड झाला. यामुळे महावितरणच्या सुमारे ५२ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. सोमवारी दुपारी दोनपर्यंत २४ तास उलटले तरी काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
तसेच हिंजवडी फेज-२ मेट्रो स्टेशन येथे वीज दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली, ज्यामुळे आयटी कंपन्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
महापारेषण कंपनीने नियोजित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळी वीजपुरवठा बंद केला होता. देखभाल आणि दुरुस्तीचे काम आटोपून वीजपुरवठा सुरू करताना, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस या अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत मोठा बिघाड झाला. परिणामी, महावितरणच्या २२ केव्हीच्या २५ वाहिन्या आणि अतिउच्चदाब ग्राहक इन्फोसिस व नेक्सट्रा या दोन ग्राहकांमध्ये एकत्रित ९१ उच्चदाब आणि ५२ हजारांहून अधिक लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. यामध्ये पिंपरी विभागातील २० हजार आणि मुळशी विभागातील ३२ हजार घरगुती व वाणिज्यिक लघुदाब ग्राहकांचा समावेश होता.
दरम्यान, महावितरणच्या जनमित्रांसह सर्व वरिष्ठ अभियंत्यांच्या परिश्रमांनी पर्यायी मार्गाने सोमवारी पहाटे ४ पर्यंत सर्व लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला. सर्वांत शेवटी कोलते पाटील टाऊनशिप उपकेंद्रातून काही औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, ८५ उच्चदाब आणि २ अतिउच्चदाब ग्राहकांची मागणी जास्त असल्यामुळे व इतरत्र वीजभार शिल्लक नसल्यामुळे महावितरणला या ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी दुपारी तीन वाजले तरी सुरू करणे शक्य झाले नाही. यामुळे ग्राहकांकडून संताप व्यक्त झाला.
बाधित परिसर
मुळशी विभागातील एक्सरबिया सोसायटी, कोलते पाटील टाऊनशिप, मारुंजी, माण, जांबे, मेरे, दत्तवाडी तसेच पिंपरी विभागातील हिंजवडी एमआयडीसी, आयटी पार्क, रायसोनी पार्कचा भाग, डॉहलर कंपनी, विप्रो सर्कल परिसर या ठिकाणी याचा दुष्परिणाम झाला होता.
गावठाण, वाड्या, वस्त्यांवरील बत्ती गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. विजेच्या लपंडावामुळे छोटे-मोठे व्यावसायिक आणि ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. - अर्चना आढाव, सरपंच, माण, आयटीनगरी
२० तासांपेक्षा जास्त काळ वीज नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. हिंजवडी भाग दोन फिडरमध्ये विभागला गेल्यामुळे अधिकाऱ्यांशी योग्य संपर्क साधता येत नाही. येथील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी आहे. - गणेश जांभूळकर, सरपंच, हिंजवडी आयटीनगरी
हिंजवडी येथील विप्रो सर्कल ते क्वॉड्रान कंपनीदरम्यान हिंजवडी फेज-२ मेट्रो स्थानकाजवळ महापारेषणचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे सकाळी येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहतूक पोलिसांनी मंगळवारपासून पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच १० जुलैपर्यंत येथे २४ तास वाहतूक पोलिस तैनात केले आहेत. - शंकर सालकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन
टीसीएस, डीएलएफ, आयगेट पटाणी (कॅप इंडिया), दाना इंडिया, आयबीएम, टेक महिंद्रा, विप्रो, डायनेस्टी, कॉग्निझंट, ॲसेंडास या औद्योगिक ग्राहकांना महावितरणने प्रत्येकी पाच तास चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा देण्याचे नियोजन केले आहे. - विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी, महावितरण