महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी महाविकास आघाडीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 13:00 IST2025-12-14T13:00:12+5:302025-12-14T13:00:38+5:30
- निवडणुकीसह मनसेच्या समावेशावर चर्चा होण्याची शक्यता

महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी महाविकास आघाडीची बैठक
पुणे : आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित लढणार की स्वतंत्र याबाबत प्रश्नचिन्ह असतानाच सोमवारी काँग्रेस भवनमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महापालिका निवडणूक एकत्रित लढण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे तसेच यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाविकास आघाडीतील समावेशावरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम राबवला जात आहे. पुढील काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांकडून निवडणुकीची जय्यत तयारी केली जात आहे. महापालिका निवडणुकीत आघाडी आणि युती होणार का याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. प्रत्येक पक्षाचे नेते आमची सर्व जागा लढवण्याची तयारी असल्याचे सांगत आहेत. महायुतीमध्ये भाजप व अजित पवारांची राष्ट्रवादी पुण्यात एकत्र लढणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर दोन राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चेने जोर धरला होता. दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना व मनसे एकत्र लढणार, अशीही चर्चा सुरू आहे. मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसकडून विरोध असल्याने महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महापालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचे स्पष्ट केले आहे.
यानंतर आता उद्या सोमवारी (दि.१५) सकाळी १० वाजता काँग्रेस भवन येथे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बैठकीत महापालिका निवडणूक एकत्रित लढवण्याबाबतची भूमिका, संभाव्य जागावाटप, समन्वय समितीची रचना तसेच संयुक्त रणनीती आणि मनसेच्या समावेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.