नीरा : महाराष्ट्राला पुढील काळात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.माध्यमांशी बोलताना हाके म्हणाले, “या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. संविधानानुसार आरक्षण मिळतं. मात्र, जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवू पाहत आहेत. त्यामुळे पुढील काळात असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. मुख्यमंत्र्यांनी सावध राहावं.” असा इशारा हाके यांनी दिला आहे.ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे शनिवारी रात्री उशिरा पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हाके यांनी यावेळी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. “पवार कुटुंबीय म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहेत,” असं त्यांनी म्हटलं. अजित पवार हे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, भांडवलदार, कारखानदार यांचे नेते असल्याचे सांगून ते जातीयवाद करत असल्याचा देखील आरोप हाके यांनी अजित पवार यांच्यावर केला. खासदार सुप्रिया सुळे या केवळ वडिलांच्या मायलेजवर निवडून येतात. “त्यांचं संसदेत काय काम आहे? म्हणून त्यांना आदर्श संसद रत्न पुरस्कार मिळतो. समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न त्यांनी कधी संसदेत मांडले आहेत का? त्यावर कधी आवाज उठवला आहे का?” असा प्रश्नही हाके यांनी उपस्थित केला.पवार कुटुंबीय नेहमीच सत्तेत असतात, म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतो“राज्याच्या राजकारणामध्ये पवार कुटुंबीय हे नेहमीच सत्तेत बसलेले असतात. त्यांच्या हाती नेहमीच तिजोरीच्या चाव्या असतात. त्यामुळेच मला त्यांच्यावर बोलावं लागतं. राज्यात सत्ता कोणाचीही येऊ द्या , भाजप, काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे असोत, पवार कुटुंबीय नेहमीच सत्तेत असतात. मग सत्ताधाऱ्यांना प्रश्न नाही विचारायचे, तर कुणाला विचारायचे? म्हणूनच मी पवार कुटुंबावर बोलतो.” असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.
महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार, हाकेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 14:32 IST