श्री काळभैरवनाथ यात्रोत्सवात महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख खोरच्या आखाड्याचा मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 09:18 IST2025-03-27T09:16:24+5:302025-03-27T09:18:19+5:30

यामध्ये सिकंदर शेख याने निकाली डावावर ही कुस्ती जिंकली आणि प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष झाला.

pune news Maharashtra Kesari Pat. Sikandar Sheikh, a medalist of Khorgaon Akhara | श्री काळभैरवनाथ यात्रोत्सवात महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख खोरच्या आखाड्याचा मानकरी

श्री काळभैरवनाथ यात्रोत्सवात महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख खोरच्या आखाड्याचा मानकरी

भांडगाव : खोर (ता. दौंड) या ठिकाणी श्री काळभैरवनाथ पीरसाहेब व तुकाई माता यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त खोरमध्ये निकाली कुस्त्यांचा भव्य असा आखाडा पार पडला. या आखाड्यामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने शेवटची मानाची १ लाख ५१ हजार रुपयांची कुस्ती जिंकली. नुकताच खोर गावामध्ये कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती आखाड्याच्या धर्तीवर श्री काळभैरवनाथ कुस्ती स्टेडियम लोकवर्गणीतून बांधण्यात आलेले आहे. यामध्ये जवळपास ८०० लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रमुख पाहुण्यांनाही या ठिकाणी बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

यात्रेनिमित्त आयोजित आखाड्याच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री काळभैरवनाथ कुस्ती स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकूण ३५ निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक कुस्तीला गावकऱ्यांतर्फे ५ हजार ते १.५ लाखांपर्यंत सौजन्य देण्यात आले होते. शेवटची कुस्ती महाराष्ट्र केसरी पहिलवान सिकंदर शेख आणि दिल्ली येथील पहिलवान बंटी कुमार सिंग यांच्यामध्ये १ लाख ५१ हजार रुपये इनामावर झाली.

यामध्ये सिकंदर शेख याने निकाली डावावर ही कुस्ती जिंकली आणि प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष झाला. शेवटून दुसरी कुस्ती पहिलवान सतीश खरात आणि पहिलवान वीरेंद्रसिंह दहिया (हरयाणा) यांच्यामध्ये ४१ हजार इनामावर झाली. यामध्ये सतीश खरातने बाजी मारली. शेवटून तिसरी कुस्ती पहिलवान सुमित मरगजे आणि पहिलवान व्यंकटेश बनकर यांच्यामध्ये ३१ हजार इनामावर झाली. या कुस्तीमध्ये पहिलवान सुमित मरगजे याने बाजी मारली.

शेवटून चौथी कुस्ती पहिलवान नाथा चौगुले आणि पहिलवान शेखर जाधव यांच्यामध्ये २५ हजार रुपये इनामावर झाली. या कुस्तीमध्ये पहिलवान नाथा चौगुले याने बाजी मारली. अशा पद्धतीने वेगवेगळ्या इनामावर एकूण ३५ कुस्त्या देशातील तसेच महाराष्ट्रातील नामांकित पहिलवानांमध्ये झाल्या. कुस्तीप्रेमींना व कुस्तीपटूंना प्रोत्साहित करण्याचे काम अंबाजी, लिंबाजी हलगी ग्रुप मोरवे (ता. खंडाळा) यांनी केले. सागर चौधरी व किसन काळे यांनी उत्कृष्ट असे कुस्ती निवेदन करून उपस्थित त्यांची मने जिंकली. यावेळी खोरगावची महिला पहिलवान, राज्य सुवर्णपदक विजेते समीक्षा श्याम चौधरी हिचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. आखाड्याच्या निमित्ताने खोरमध्ये दौंड, पुरंदर, शिरूर, इंदापूर, हवेली या भागांतून अनेक कुस्तीशौकीन उपस्थित होते.

प्रत्येक गावात चार पहिलवान तयार व्हावेत. यामुळे कोणाची गावाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. प्रत्येक गावाने खोरगावचा आदर्श घेत कुस्ती मैदाने तयार करावीत. घराघरांत पहिलवान तयार करावेत. कुस्ती वाढवावी, कुस्ती रुजवावी; यामुळे पहिलवान तयार होतील व उद्या हेच पहिलवान देशासाठी मेडल मिळवतील.  - पै. सिकंदर शेख, महाराष्ट्र केसरी

आमचे खोरगाव वांगी व अंजीर या दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे; परंतु जुन्या काळाप्रमाणे कुस्त्यांचा आखाडा मनाप्रमाणे होत नसल्याची खंत गावातील अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ बोलून दाखवत होते. त्यांची ही खंत भरून काढण्यात आम्हा सर्वांना यश आले. यामध्ये पोलिस पै. संदीप चौधरी, सर्व खोर ग्रामस्थ व यात्रा कमिटी खोर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. भविष्यातही अशाच पद्धतीने आखाडे भरवण्याचा आमचा सर्व गावकऱ्यांचा एकजुटीने प्रयत्न राहील.  - पै. सागर चौधरी, आयोजक

Web Title: pune news Maharashtra Kesari Pat. Sikandar Sheikh, a medalist of Khorgaon Akhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.