'नाथजल'च्या नावाखाली होतेय लूट; वल्लभनगरला चढ्या भावाने विक्री; प्रवाशांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:03 IST2025-07-29T14:03:17+5:302025-07-29T14:03:33+5:30

- तक्रार करुनही एसटी प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याचा आरोप

pune news Looting is taking place in the name of 'Nathjal'; Vallabhnagar is being sold at a high price | 'नाथजल'च्या नावाखाली होतेय लूट; वल्लभनगरला चढ्या भावाने विक्री; प्रवाशांमध्ये नाराजी

'नाथजल'च्या नावाखाली होतेय लूट; वल्लभनगरला चढ्या भावाने विक्री; प्रवाशांमध्ये नाराजी

- रवींद्र जगधने

पिंपरी :
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी 'नाथजल' या नावाने बाटलीबंद पाण्याची विक्री सुरू केली असली तरी वल्लभनगर एसटी आगारात या योजनेच्या नावाखाली प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे.'नाथजल'च्या एक लिटर बाटलीची अधिकृत किंमत १५ रुपये असताना, स्टॉलधारकांकडून प्रवाशांना २० रुपये मोजावे लागत आहेत. 'कूलिंग चार्ज'च्या नावाखाली होणाऱ्या या अतिरिक्त आकारणीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या संकल्पनेतून २०२० मध्ये 'नाथजल' ही योजना सुरू झाली. संत एकनाथ महाराज यांच्या नावाने सुरू झालेल्या या योजनेत पुण्यातील एका खासगी कंपनीला पाण्याचा पुरवठा   करण्याचा ठेका देण्यात आला. ६५० मिलिलिटर आणि १ लिटरच्या बाटलीबंद पाण्याची विक्री अनुक्रमे १० रुपये आणि १५ रुपये दराने होणे अपेक्षित आहे. यातून एसटीला प्रत्येक ६५० मिलिलिटर बाटलीमागे ४५ पैसे आणि एक लिटर बाटलीमागे एक रुपया मिळतो. मात्र, वल्लभनगर आगारासह राज्यभरातील बहुतांश स्टॉलवर हे पाणी जास्त दराने विकले जात आहे.

वल्लभनगर आगारात प्रवाशांची जादा संख्या

पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये राज्यभरातील नागरिक नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. वल्लभनगर आगारातून इच्छितस्थळी जाणाऱ्यांची संख्या जादा आहे.

आरोग्यविषयक समस्या

प्रवाशांनी याबाबत विचारणा केल्यास स्टॉलधारक 'कूलिंग चार्ज'चे कारण देतात. विशेष म्हणजे, यासंदर्भात वल्लभनगर बसस्थानकात तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. यापूर्वी स्थानिक ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याची अव्वाच्या सव्वा किमतीत विक्री होत होती, ज्यामुळे प्रवाशांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत होते.

बनावट प्रवासी पाठवूनही नाथजल पाणी बाटलीच्या विक्री किमतीची खातरजमा करण्यात येते. बाटलीची विक्री किंमत जास्त घेतल्याचे आढळले नाही
वैशाली कांबळे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वल्लभनगर आगार 

Web Title: pune news Looting is taking place in the name of 'Nathjal'; Vallabhnagar is being sold at a high price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.