लोणी काळभोर वाहतूक विभागाचे वाहतूक नियमनापेक्षा वसुलीवर भर; वाहतूक कोंडी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:39 IST2025-11-04T14:39:12+5:302025-11-04T14:39:40+5:30
लोणी काळभोर वाहतूक विभागातील काही ठराविक पोलीस अंमलदार सोडले तर इतर पोलीस वाहतूक कोंडीच्या वेळी वाहतूक नियमन करण्याऐवजी वसुलीकडे लक्ष देत आहेत.

लोणी काळभोर वाहतूक विभागाचे वाहतूक नियमनापेक्षा वसुलीवर भर; वाहतूक कोंडी वाढली
लोणी काळभोर : लोणी काळभोर वाहतूक विभागातील काही ठराविक पोलीस अंमलदार सोडले तर इतर पोलीस वाहतूक कोंडीच्या वेळी वाहतूक नियमन करण्याऐवजी वसुलीकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे पूर्व हवेलीत वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र नित्याचेच झाले आहे.  पुणे–सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन या दरम्यान लोणी स्टेशन, कुंजीरवाडी, नायगाव फाटा व उरुळी कांचन हद्दीतील एलाईट चौक आणि तळवाडी चौक अशा पाच ठिकाणी वाहतुकीची कोंडी सतत जाणवत आहे.
लोणी स्टेशन हद्दीत स्टेशन चौक ते कदमवस्ती या दरम्यान वाहने रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात उभी केली जात आहेत. असे असतानाही वाहतूक पोलिस रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना अभय देत असल्याने लोणी स्टेशन हद्दीत दिवसाआड अपघात होत आहेत.
ऑईल कंपन्यांचे टँकर रस्त्यावर उभे राहत असल्याची समस्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना डोळ्यांनी दिसत असतानाही सर्वजण डोळे बंद करून बसले आहेत. वाहतूक विभागातील पोलिस या चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्याऐवजी या चौकातून ये-जा करणाऱ्यांकडून वसुलीचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.
गरीब वाहनधारकांसह सर्वसामान्य वाहनधारकांना वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार वाहनांचा फोटो काढून मोठा दंड आकारत आहेत, तसेच अनेक वाहनधारकांशी हुज्जत घालून त्यांचा अपमान करत आहेत. विशेष म्हणजे, यात अनेक वाहनधारकांची कुठलीच चूक नसताना हा आर्थिक फटका नाहक सहन करावा लागत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांचे नेमके उद्दिष्ट “वसुली की वाहतूक नियमन?” असा प्रश्न उभा राहिला आहे.
 
‘वसूली’ कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का?
लोणी स्टेशन चौकातील वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहतूक पोलीस भररस्त्यात एका नामांकित हॉस्पिटलच्या गेटसमोर उभा राहत असून, रस्त्यात गाड्या अडवून त्यांच्याकडून पठाणी वसुली करत आहे. वाहतूक पोलीस रस्त्यातच थेट समोर येत असल्याने वाहनचालकांची गडबड होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वाहतूक पोलिस व त्यांचे वरिष्ठ अधिकारी जागे होणार का? आणि या ‘वसूली’ कर्मचाऱ्यावर प्रशासनाच्या वतीने काय कारवाई होणार, याकडे पूर्व हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लोणी स्टेशनच्या पुढील चौकाला एमआयटी कॉर्नर नावाने मागील काही वर्षांपासून ओळखले जाऊ लागले आहे. मात्र, हा कॉर्नर आता अपघातांचे मोठे ठिकाण बनू लागला आहे. कॉर्नरच्या दोन्ही बाजूंना असलेल्या हॉटेलमालकांनी पार्किंगसाठी जागा न सोडल्याने हा चौक अतिशय धोकादायक बनला आहे. आशीर्वाद हॉटेलच्या बाजूने स्टेशनहून गावात जाताना एमआयटी कॉर्नरची अवस्था अतिशय चिंताजनक वाटावी अशी बनली आहे.