इंदापूर नगरपरिषदेसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६० टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:38 IST2025-12-02T19:38:31+5:302025-12-02T19:38:50+5:30
- सरशी कोणाची होणार याकडे पुणे जिल्हा व राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.

इंदापूर नगरपरिषदेसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६० टक्के मतदान
इंदापूर : पुणे जिल्हा महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झाले होते. किरकोळ वादावादीचे एकदोन प्रकार वगळता शांतता व सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया सुरु होती. मतदानाची गती पहाता ७५ ते ८० टक्के मतदान होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरु ठेवण्यात आले असले तरी मतदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मतदारांचे मतदान होईपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहिल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप या पक्षांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधक पसंती मिळालेले माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात प्रवेश द्यावा, मात्र उमेदवारी देवू नये, पक्षाच्या जुन्या निष्ठावंतास नगराध्यक्ष पदाची संधी द्यावी यासाठी अडून बसल्यानंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बधत नाही असे दिसल्यानंतर, पदाचा राजीनामा देण्याची तयारी ठेवून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी उभा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून पुढे आले. त्यांना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने पाठींबा देण्यासाठी कृष्णा भीमा विकास आघाडी पॅनल उभा केले. त्यांचे राजकीय हाडवैरी हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांनी साथ दिली. त्यामुळे त्यांच्या विरोधात नगराध्यक्षपदाचे दावेदार असणारे भरत शहा व त्यांच्या पाठीशी असणारे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल यामध्ये सरळ लढत होणार आहे. प्रचाराला मिळालेल्या मोजक्या दिवसात दोन्ही बाजूंनी प्रचाराचा धडाका लावला होता. सरशी कोणाची होणार याकडे पुणे जिल्हा व राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या १० प्रभागांतील ५६ उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या ५ उमेदवारासाठी उभारण्यात आलेल्या २७ मतदान केंद्रांमध्ये आज सकाळी साडेसात वाजता मतदान सुरु झाले. सकाळपासूनच मतदानाचा वेग चांगला होता. दुपारी दीड वाजेपर्यंत ७ हजार ३०८ पुरुष व ७ हजार ६८८ महिला व ४ इतर अशा एकूण १५ हजार मतदारांनी मतदान केले होते. मतदानाची टक्केवारी ६०.४१ एवढी नोंदवली गेली होती.
प्रभाग क्रमांक ५ मधील कृष्णा भीमा विकास आघाडी पॅनलचे उमेदवार प्रा.कृष्णा ताटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अक्षय सूर्यवंशी हे मतदानासाठी येणाऱ्या ज्येष्ठ मतदारांचे पाया पडून आशीर्वाद घेत असलेल्या प्रकाराबाबत हरकत घेतल्याने काही काळ वाद झाला. त्यानंतर मतदार यादीत एकाच मतदाराची दोन वेळा नावे आल्याबद्दल प्रभाग क्रमांक ४ मधील कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार वसीम अब्दुलहक शेख व रोहित पाटील यांच्या खडाजंगी उडाली. या दोन्ही घटनेनंतर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहिली.