पोळे गावात बिबट्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या जनावरांना लक्ष्य; वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:16 IST2025-09-11T13:15:35+5:302025-09-11T13:16:24+5:30

संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्यांना पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

pune news leopards swarm in Pole village; Targeting farmers' animals; Demand to install cages with the forest department | पोळे गावात बिबट्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या जनावरांना लक्ष्य; वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी

पोळे गावात बिबट्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या जनावरांना लक्ष्य; वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी

पानशेत : पानशेत धरण परिसरातील पोळे (ता. राजगड) येथे दोन बिबट्यांनी मुक्काम ठोकला असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक नर आणि एक मादी अशा या दोन बिबट्यांनी गेल्या पाच दिवसांत सहा वेळा हल्ले करून शेतकऱ्यांची चार बकऱ्या आणि तीन कुत्री फस्त केली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्यांना पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

देवमाळ वस्ती येथील शेतकरी बबन भांबू ढेबे यांची एक शेळी आणि बोकड, तसेच लक्ष्मण कोंडीबा ढेबे यांची एक शेळी बिबट्यांनी खाल्ली. पेरूदंडवस्ती येथील रामभाऊ विठ्ठल ढेबे यांच्या घराजवळून एक कुत्रा फस्त करण्यात आला. याशिवाय, दि. १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता बबन भांबू ढेबे यांच्या घराजवळील एक कुत्री, तर दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कंधारवस्ती येथील आप्पा भागुजी ढेबे यांची एक शेळी आणि त्याच दिवशी देवमाळ वस्ती येथील बबन भांबू ढेबे यांचा एक कुत्रा बिबट्यांनी फस्त केला.

बिबट्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे पोळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. ‘दररोज जनावरांवर हल्ले होत असून आमचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी,’ अशी मागणी शेतकरी बबन भांबू ढेबे यांनी केली. या घटनेची माहिती पांडुरंग ढेबे यांनी वनविभागाला फोनद्वारे कळवली आहे. वनविभागाचे वनरक्षक संतोष रणसिंगे आणि वैशाली हडाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी (वेल्हे) अनिल लांडगे म्हणाले, ‘पोळे ग्रामस्थांशी संवाद साधला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार मदत दिली जाईल. ग्रामस्थांचे लेखी निवेदन मिळाल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावला जाईल.’ वनविभागाने शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘वनक्षेत्रात जनावरे सोडू नयेत. बिबट्यांना लहान जनावरे सोपे लक्ष्य ठरतात. त्यामुळे बकऱ्या आणि कुत्र्यांना एकटे सोडू नये. तसेच, नागरिकांनी एकट्याने जंगलात जाऊ नये,’ असे वनविभागाने सांगितले. ‘पोळे गावात दोन बिबट्यांचा मुक्काम आहे. दररोज जनावरांवर हल्ले होत असून, आमचे नुकसान होत आहे. यामुळे भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने बिबट्यांना पकडून आम्हाला दिलासा द्यावा,’ असे शेतकरी बबन भांबू ढेबे यांनी सांगितले. पोळे गावातील बिबट्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी वनविभाग आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वयाची गरज आहे. जोपर्यंत बिबट्यांना पकडले जात नाही, तोपर्यंत गावकऱ्यांमधील भीती कायम राहणार आहे.

Web Title: pune news leopards swarm in Pole village; Targeting farmers' animals; Demand to install cages with the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.