केडगावात बिबट्याने उचलले कुत्र्याचे पिल्लू; परिसरात दहशतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 12:28 IST2025-09-14T12:27:25+5:302025-09-14T12:28:05+5:30
- स्थानिक रहिवासी अशोक हांडाळ यांनी सांगितले, ‘नागरिकांच्या समोरच पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. वनविभागाकडून व्यवस्थित उपाययोजना होत नाहीत.

केडगावात बिबट्याने उचलले कुत्र्याचे पिल्लू; परिसरात दहशतीचे वातावरण
केडगाव : येथील बावीस फाटा परिसरातील ढवळे वस्ती येथे मंगळवारी सायंकाळी ७:४५ वाजता एका बिबट्याने महादेव ढवळे यांच्या अंगणातून कुत्र्याच्या पिल्लाला उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.
महादेव ढवळे यांच्या घरी त्यांची पत्नी अंजना, मुलगा जयंत आणि सून प्रतीक्षा यांनी बिबट्याला पाहताच आरडाओरडा केला. मात्र, बिबट्याने त्यांना न जुमानता कुत्र्याच्या पिल्लाला सहज उचलून नेले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवासी अशोक हांडाळ यांनी सांगितले, ‘नागरिकांच्या समोरच पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. वनविभागाकडून व्यवस्थित उपाययोजना होत नाहीत.
कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यापूर्वीही अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बिबट्याची भीती वाटत आहे. नागरिकांनी वनविभागाकडून तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसू शकेल.