कोळवण खोऱ्यातील डोंगरगावात बिबट्याचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:19 IST2025-05-18T13:19:05+5:302025-05-18T13:19:30+5:30
या परिसरामध्ये अनेक फार्म हाऊस बांधलेले असून स्थानिक शेतकऱ्यांसह बरेच लोक येथे वास्तव्यास आहेत.

कोळवण खोऱ्यातील डोंगरगावात बिबट्याचे दर्शन
कोळवण : डोंगरगाव (ता. मुळशी) येथील गिरीवन प्रकल्पामध्ये (दि. १५) रोजी सायंकाळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या परिसरामध्ये अनेक फार्म हाऊस बांधलेले असून स्थानिक शेतकऱ्यांसह बरेच लोक येथे वास्तव्यास आहेत. तसेच केअरटेकर व कामगार वर्ग ही मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. डोंगर पायथ्याला होतले, डोंगरगाव व वाळेण ही गावे आहेत.
प्रकल्पामध्ये बांधकाम करणारे कामगार काम संपवून चारचाकीतून जात असताना रस्त्याच्या कडेला बिबट्या बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी रस्त्याच्या कडेला बसलेल्या बिबट्याचे फोटो व व्हिडिओ काढला. गिरीवन मेंटेनन्स सहकारी संस्था (म) मार्फत वनपरिक्षेत्र कार्यालय पौड (मुळशी ) यांना बिबट्या संदर्भात खबरदारीचे उपाययोजनेसाठी पत्र देण्यात आलेले आहे. या परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वन विभागाने त्वरित पावले उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बिबट्याच्या वावरासंदर्भात माहिती व छायाचित्रे मिळाली असून रेस्क्यू टीम सदर ठिकाणी व परिसरातील गावात जनजागृतीसाठी पाठवीत आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये. बिबट्या संदर्भातील खबरदारीचे उपाय योजनांचे पालन करावे. - प्रताप जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी, पौड (मुळशी)