पिंपरी पेंढार परिसरात वाढला बिबट्यांचा उपद्रव; तीन शेळ्या फस्त, शेतकरी धास्तावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:02 IST2025-10-15T17:00:30+5:302025-10-15T17:02:32+5:30
- शेतात काम करताना शेतकरी आणि मजुरांना जीव धोक्याखाली घ्यावा लागत आहे. काही मजूरही बिबट्याच्या भीतीने कामावर येण्यास नकार देत आहेत

पिंपरी पेंढार परिसरात वाढला बिबट्यांचा उपद्रव; तीन शेळ्या फस्त, शेतकरी धास्तावले
आळेफाटा : पिंपरी पेंढार परिसरात बिबट्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, मंगळवारी (दि. 14) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोंबडवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जयवंत रभाजी जाधव यांच्या तीन गाभण शेळ्या मारल्या गेल्या. या घटनेत त्यांना ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
कोंबडवाडी, गाजरपट, पीरपट, खडकमाळ या परिसरात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, दिवसाढवळ्या बिबटे मोकळ्या रस्त्यांवरही दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात काम करताना शेतकरी आणि मजुरांना जीव धोक्याखाली घ्यावा लागत आहे. काही मजूरही बिबट्याच्या भीतीने कामावर येण्यास नकार देत आहेत. या भागात मागील काही महिन्यांपासून पाळीव प्राण्यांवर बिबट्यांच्या हल्ल्यांचा वाढता प्रकार दिसून येत आहे. अनेक कुत्रे गायब झाले असून, जनावरांवर हल्ले होऊन त्यांचे ठार किंवा जखमी होण्याचे प्रकारही घडले आहेत. विशेष म्हणजे, याच परिसरात यापूर्वी दोन महिलांचा बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्यूही झाला आहे.
वन विभागाने काही ठिकाणी पिंजरे लावले असले तरी ती संख्या अगदीच अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पकडलेले बिबटे पुन्हा कुठे सोडले जातात, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. शेतकऱ्यांनी ठामपणे म्हटले आहे, “वनातील बिबटे आमच्या शेतात नकोत, आम्हाला आमची शेती करायची आहे. वन विभागाने योग्य ती कार्यवाही करून बिबट्यांना जंगलात परत न्यावे.”
सध्या सोयाबीन काढणी व कांदा लागवडीची कामे सुरू असतानाही बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीचे काम धोक्यात आले आहे. दिवसाही बिबटे दिसत असल्याने नागरिक घराबाहेर पडताना घाबरतात. शेतकरी म्हणतात, “कुत्रा हा शेतकऱ्याचा मित्र होता, पण आता तो दिसेनासा झाला आहे. बिबट्यांनी त्यांनाही संपवले. जर लवकर उपाययोजना झाल्या नाहीत, तर मानवी जीवितालाही धोका निर्माण होणार आहे. या गंभीर परिस्थितीवर वन विभागाकडून तातडीची कारवाई करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्यांना पकडून कायमस्वरूपी जंगलात हलवावे, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.