खेड, शिरूरमध्ये बिबट्यांचा हल्ला ठरतोय ‘मृत्यूचा पंजा’; नागरिक भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:10 IST2025-11-28T12:10:38+5:302025-11-28T12:10:52+5:30
- शेतापासून थेट घराच्या अंगणापर्यंत बिबट्याचा शिरकाव; वनविभागाच्या उपाययोजना अपुऱ्या

खेड, शिरूरमध्ये बिबट्यांचा हल्ला ठरतोय ‘मृत्यूचा पंजा’; नागरिक भयभीत
- भानुदास पऱ्हाड
शेलपिंपळगाव : खेड आणि शिरूर तालुक्यांत बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्तीतील त्यांचा शिरकाव हा आता अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. बिबट्यांनी मानवावर केलेल्या हल्ल्यांच्या ताज्या घटनांमुळे संपूर्ण परिसरात मोठी दहशत पसरली असून, यामध्ये काही निष्पाप नागरिकांचा बळी, तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे बिबट्यांचा वावर म्हणजे ‘मृत्यूचा पंजा’ झाला आहे.
मागील काही दिवसांमध्ये या दोन्ही तालुक्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, तसेच खेड तालुक्यातील काही भागांत झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. विशेषतः शेतात काम करणारे आणि लहान मुले बिबट्यांचे लक्ष्य ठरत आहेत. निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे एका साडेचार वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना ताजी आहे. शेतीच्या विशेषतः उसाच्या आश्रयाने असलेले बिबटे आता थेट मानवी वस्तीत, घराच्या अंगणापर्यंत पोहोचत असल्याच्या घटना सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आल्या आहेत. यामुळे गावकरी घरातही सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली आहे.
बिबट्यांच्या भीतीमुळे अनेक गावांमध्ये सायंकाळ होताच घराबाहेर पडणे नागरिकांनी बंद केले आहे. शेतीच्या कामांवर आणि विद्यार्थ्यांच्या शाळांवरही याचा परिणाम होत आहे. एका बाजूला मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना दुसऱ्या बाजूला वनविभागाकडून होणाऱ्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. खेड आणि शिरूर हे दोन्ही तालुके ऊस आणि अन्य दाट शेतीच्या प्रदेशामुळे बिबट्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनली आहेत. या नैसर्गिक अधिवासाचा अभाव आणि अन्नाचा शोध यांमुळे बिबट्यांचा वस्तीत शिरकाव वाढला आहे.
तत्काळ उपाययोजनांची मागणी :
वनविभागाची गस्त वाढवावी : मानवी वस्तीजवळ बिबट्यांचा वावर असलेल्या संवेदनशील ठिकाणी वनविभागाने २४ तास गस्त घालावी.
तत्काळ पिंजरे लावावेत : ज्या ठिकाणी बिबट्यांचे हल्ले झाले आहेत, त्या परिसरात युद्धपातळीवर पिंजरे लावून बिबट्यांना पकडावे.
शासनाने हस्तक्षेप करावा : या बिबटप्रवण क्षेत्रासाठी विशेष निधी आणि मनुष्यबळ देऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी.
बिबट्यांच्या हल्ल्यांपासून बचावासाठी घ्यायची दक्षता :
एकटे फिरणे टाळा : विशेषतः संध्याकाळ आणि पहाटे एकट्याने शेतात किंवा वस्तीबाहेर जाणे पूर्णपणे टाळावे.
उजेडाचा वापर : बाहेर जाताना मोठ्या आवाजात संगीत लावावे किंवा टॉर्च/प्रकाशाचा वापर करावा.
लहान मुलांना जपून : लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका. त्यांच्यावर लक्ष ठेवा.
वनविभागास कळवा : बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाच्या नियंत्रण कक्षाला माहिती द्या.
घडलेल्या घटना :
पिंपरखेड (शिरूर) : १३ वर्षीय मुलगा रोहन बोंबे याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही गेल्या १५ दिवसांतील तिसरी घटना होती.
पिंपरखेड (ता. शिरूर) गावात यापूर्वी ५ वर्षीय मुलगी शिवन्या बोंबेचा बळी गेला होता.
जांबूत (शिरूर) : ७० वर्षीय महिला भागूबाई जाधव यांना बिबट्याने ठार मारून उसाच्या शेतात ओढत नेले.
काळेचीवाडी (खेड) : घराच्या अंगणात झोक्यावर खेळणाऱ्या एका लहान मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचाव झाला. त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
निमगाव खंडोबा (खेड) : निमगाव खंडोबा येथील भगतवस्ती येथे घराबाहेर खेळत असताना देवांश गव्हाणे या साडेचार वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले.
आपत्ती - प्रवण क्षेत्र घोषित...
शिरूर आणि खेड या तालुक्यांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष खूप वाढला आहे. एकट्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरातच २० दिवसांत ३ जणांचा बळी घेणाऱ्या एका नरभक्षक बिबट्याला वनविभागाने नंतर ठार केले होते. या वाढत्या हल्ल्यांमुळेच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या चार तालुक्यांमधील २३० हून अधिक गावे वारंवार बिबट्याच्या हल्ल्यांसाठी आपत्तीप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.
सातत्याने बिबट्याचे दर्शन...
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील करंदी, पऱ्हाडवाडी, वाजेवाडी, मांजरेवाडी, चौफुला, तर खेड तालुक्यातील चिंचोशी, बहुळ, सिद्धेगव्हाण, कोयाळी-भानोबाची, दौंडकरवाडी, रामनगर, वडगाव, मरकळ, गोलेगाव या गावांमध्ये सर्वांत दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत आहे. विशेष म्हणजे आळंदी शहरातील डुडुळगाव परिसरातदेखील सातत्याने बिबट्या नजरेस पडत आहे. त्यामुळे सदरच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
“वनविभाग केवळ बिबट्यांच्या हल्ल्यानंतर पिंजरे लावते; परंतु, बिबट्यांचा वावर वाढू नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना, गस्त वाढवणे किंवा जनजागृती मोहीम परिणामकारकपणे राबवली जात नाही.” - प्रवीण ढोकले, स्थानिक ग्रामस्थ, करंदी.