Pune Leopard Attack: अष्टापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 09:37 IST2025-12-10T09:37:08+5:302025-12-10T09:37:23+5:30
कोतवाल या दशक्रिया विधीसाठी घरातून बाहेर पडत असतानाच त्यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत हल्ला केला.

Pune Leopard Attack: अष्टापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर
उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील खोलशेत वस्ती परिसरात मंगळवारी (दि.९) पहाटे सव्वा पाचच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली. अंजना वाल्मीक कोतवाल असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांच्यावर वाघोलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोतवाल या दशक्रिया विधीसाठी घरातून बाहेर पडत असतानाच त्यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत हल्ला केला. त्यांच्या आरडाओरडीनंतर सोबत असलेल्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांची सुटका केली आणि तातडीने रुग्णालयात हलविले. या अनपेक्षित घटनेमुळे अष्टापूर परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधला असून, विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करत आहे. परिसरात बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
दरम्यान, शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी महिलेची विचारपूस केली. कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी आवश्यक वैद्यकीय मदत तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी वनविभागाचे अधिकारी प्रशांत खाडे व महादेव मोहिते यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागाला परिसरात पिंजरे लावणे, रात्री व पहाटेच्या वेळेत गस्त वाढविणे आदी उपाययोजना करण्याचे निर्देश पवार यांनी दिले आहेत. तसेच नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.