पुणे : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने तंत्रज्ञानाची कास धरत सुरू केलेल्या 'ई-रजिस्ट्रेशन' प्रणालीला पुणेकरांनी अक्षरशः उचलून धरले आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात झालेल्या एकूण ३३ हजार ७८७ ई दस्त नोंदणींपैकी निम्म्याहून अधिक अर्थात ५२ टक्के वाटा एकट्या पुणे शहराचा आहे. पुणेकरांनी 'डिजिटल नोंदणी'मध्ये राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाच्या चकरा वाचवणारी ही सुविधा आता घराघरांत पोहोचली आहे.
राज्यात बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातूनच दस्त नोंदणीची सुविधा २०२० मध्ये सुरू करण्यात आली. यामुळे ग्राहकांना दुय्यम निबंधक कार्यालयात न जाता, बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयामधूनच घरबसल्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करता येत आहे. वेळेची बचत आणि मध्यस्थांची गरज नसल्याने नागरिकांचा कल याकडे वाढला आहे, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक (माहिती तंत्रज्ञान) अभयसिंह मोहिते यांनी दिली.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन आर्थिक वर्षांत राज्यातील एकूण ई-दस्त नोंदणी ३३,७८७ झाली आहे. तर पुणे शहरात तब्बल १७ हजार ६०८ दस्तांची नोंदणी झाली आहे. तर पुणे ग्रामीण भागात ५ हजार ९०४ दस्त नोंदवण्यात आले आहेत. पुणे विभागाचा (कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह) विचार केल्यास हा आकडा २३ हजार ७९१ इतका आहे. यावरून पुणेकरांसह विभागातील नागरिकही पारदर्शक आणि वेगवान अशा ई-प्रणालीला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरक्षिततेचा 'ई-एसबीटीआर' गड
मुद्रांक शुल्क भरण्यासाठी वापरण्यात येणारी 'ई-एसबीटीआर' ही प्रणाली कमालीची सुरक्षित ठरली आहे. २०१३ पासून अंमलात असलेल्या या प्रणालीमध्ये आजवर एकही गैरप्रकार समोर आलेला नाही. डुप्लिकेशन किंवा फसवणुकीला कोणताही वाव नसल्याने या डिजिटल व्यवहारांची विश्वासार्हता वाढली आहे.
दस्त नोंदणी आकडेवारीचा आरसा (२०२३ ते २०२६)
शहर- २०२३-२४ -२०२४-२५ -२०२५-२६ -एकूण दस्त
पुणे शहर- ७,९९७ -४,६१६- ४,९९५ -१७,६०८
पुणे ग्रामीण -८५६ -२,२७५ -२,७७३ -५,९०४
जिल्हा - ८५५३-६८९१-७७६८-२३,७९१
“नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करत आहोत. ई-रजिस्ट्रेशनमुळे दस्त नोंदणीची प्रक्रिया केवळ सोपीच झाली नाही, तर ती अधिक सुरक्षित आणि पारदर्शक झाली आहे,” असा विश्वास मोहिते यांनी व्यक्त केला आहे.
ई-रजिस्ट्रेशन : विभागनिहाय दस्त
विभाग/शहर- २०२३-२४ -२०२४-२५ -२०२५-२६ --एकूण दस्त
पुणे विभाग - ८५५३-६८९१-७७६८-२३,७९१
मुंबई-१,२९३ -१,८३९ -२,३६९ -५,५०१
ठाणे - ६७५ -६८८ -७०१ -२,०६४
नागपूर-२१८-१,४४३-२५७-१,९१८
लातूर-१२१-५६-४२-२१९
छत्रपती संभाजीनगर -९५-३१-३०-१५६
अमरावती -६४ --२२ -- ० --८६
नाशिक-३१-८ -१३ -५२
एकूण -११,४७८ -११,०८५ -११,२२४ -३३,७८७
-------
महत्त्वाचे मुद्दे :
पुण्याचा वरचष्मा : एकूण ३३ हजार ७८७ ई-नोंदणींपैकी १७ हजार ६०८ नोंदणी एकट्या पुणे शहरात झाल्या आहेत. म्हणजेच राज्यातील एकूण ई-रजिस्ट्रेशनमध्ये पुणे शहराचा वाटा ५२ टक्के इतका मोठा आहे.
पुणे विभाग : पुणे शहर, ग्रामीण, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर मिळून पुणे विभागात एकूण २३ हजार ७९१ दस्तांची नोंदणी झाली आहे.
मुंबईतही वाढ : मुंबईत दरवर्षी ई-रजिस्ट्रेशनची संख्या वाढत असून २०२५-२६ मध्ये ही संख्या २ हजार ३६९ वर पोहचली आहे.
स्थिर वाढ : राज्याची एकूण आकडेवारी पाहता, दरवर्षी सरासरी ११ हजारांहून अधिक नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत.
Web Summary : Pune leads Maharashtra in e-registrations, accounting for 52% of the state's total. 33,787 documents registered over three years, with Pune city recording 17,608. The secure 'e-SBTR' system enhances trust and ease.
Web Summary : ई-पंजीकरण में पुणे, महाराष्ट्र में सबसे आगे है, राज्य के कुल का 52% हिस्सा है। तीन वर्षों में 33,787 दस्तावेज़ पंजीकृत, पुणे शहर में 17,608 दर्ज। सुरक्षित 'ई-एसबीटीआर' प्रणाली विश्वास और आसानी बढ़ाती है।