शिरूर पोलिस ठाण्यात वकील, शेतकऱ्यांचा गोंधळ; नेमकं कारण काय ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:13 IST2025-07-24T15:12:26+5:302025-07-24T15:13:07+5:30
शिरूर शहराजवळ शिरूर ते करडे गावादरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे रुंदीकरण काम औद्योगिक विकास महामंडळाकडून सुरू आहे. यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे.

शिरूर पोलिस ठाण्यात वकील, शेतकऱ्यांचा गोंधळ; नेमकं कारण काय ?
शिरूर : शिरूर ते करडे गावा दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे रुंदीकरण व वीज वाहक खांबांच्या कामाला विरोध करत स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यातील आंदोलकांची धरपकड केल्याने शिरूर पोलिस ठाण्यात शेतकरी व वकिलांनी गोंधळ घातला.
शिरूर शहराजवळ शिरूर ते करडे गावादरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे रुंदीकरण काम औद्योगिक विकास महामंडळाकडून सुरू आहे. यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. या रस्त्यासाठी शासकीय मोजणी करण्यात आली नाही. येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन केलेले नाही. अशाप्रकारे औद्योगिक विकास महामंडळ मनमानी पद्धतीने हे काम करत असून अनेक शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.
याबाबत शेतकरी न्यायालयात गेले आहेत. असे असताना बुधवारी (दि.२३ ) दुपारी याच रस्त्याच्या बाजूने विजेचे खांब उभे करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. हे समजताच परिसरातील शेतकरी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी आंदोलन करत हे काम बंद पाडले. दरम्यान औद्योगिक विकास महामंडळाने या कामासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शिरूर पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेत आंदोलकांची धरपकड केली. या आंदोलकामध्ये ॲड. मगर हे होते. पोलिसांनी त्यांनाही पकडून गाडीत घातले व सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. ही माहिती कळताच घोडनदी बार असोसिएशनच्या पदाधिकारी व इतर वकिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच मोठ्या प्रमाणावर स्थानिक शेतकरीही पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी बेकायदेशीर कारवाई केल्याचे आरोप करत तसेच मारहाण केल्याचे आरोप करत येथे गोंधळ घातला.
दरम्यान, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आंदोलकांना नोटीस बजावून सोडत असल्याचे सांगितले. कायदेशीर मार्गाने लढा लढण्याचे सांगत सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. या प्रसंगी ॲड. निनाद मगर, घोड नदी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित खेडकर, ॲड. शिरीष लोळगे, ॲड. संजय वखारे, बाजीराव वखारे यांच्यासह इतर वकील, महिला व शेतकरी उपस्थित होते.