पूर्वकल्पना दिली नसल्याने रिंगरोडबाधित जमिनीची मोजणी करून देणार नाही; शेतकऱ्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 15:48 IST2025-04-13T15:48:04+5:302025-04-13T15:48:57+5:30
१५ तारखेला कदमवाकवस्ती हद्दीत भूसंपादनाची नोटीस उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी काढली आहे?

पूर्वकल्पना दिली नसल्याने रिंगरोडबाधित जमिनीची मोजणी करून देणार नाही; शेतकऱ्यांचा इशारा
लोणी काळभोर : प्रारूप विकास योजनेतील ६५ मीटर रुंद रस्त्यासाठी सन २०१५ च्या नवीन भूसंपादन अधिनियमाद्वारे खासगी वाटाघाटीने थेट खरेदी करावयाच्या जमिनीच्या भूसंपादन प्रकियेची मोजणी येत्या १५ तारखेला कदमवाकवस्ती हद्दीत पोलिस बंदोबस्तात करण्यात येणार असल्याची नोटीस भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी काढली आहे; परंतु या मोजणीसंदर्भात रिंगरोडबाधित शेतकऱ्यांना कसलीही नोटीस बजावण्यात आली नसल्याचे स्थानिक शेतकरी म्हणत आहेत.
या रिंगरोडमध्ये जाणाऱ्या जमिनीचा व घरांचा मोबदला कसा देणार? किती देणार? याबाबतदेखील कोणतीही पूर्वकल्पना शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा आरोप रिंगरोडबाधित शेतकऱ्यांनी केला आहे. या रिंगरोडमध्ये जमिनी गेल्याने काही शेतकरी व नागरिकांचे पूर्वजात व्यवसाय बंद पडणार असून, काही लोक बेघरदेखील होणार आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन करूनच मोजणी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील मधुबन कार्यालयात यासंदर्भात रिंगरोडबाधित शेतकऱ्यांची बैठक शुक्रवारी (दि. ११) संध्याकाळी पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी मोबदल्याबाबत भूमिका स्पष्ट केली. या बैठकीस शेतकरी गणपत चावट, माजी उपसरपंच बाबाराजे काळभोर, सदस्य आकाश काळभोर, उद्योजक किशोर टिळेकर, सुशील चावट, मुकुंद काळभोर, सुभाष काळभोर, बाबूशेट काळभोर व इतर शेतकरी उपस्थित होते.
रिंगरोडसाठी अंदाजे १७ एकर जमीन
पुणे रिंगरोड हा ६५ मीटरचा असून बावडी, लोहगाव, वाघोली, मांजरी खुर्द, कदमवाकवस्ती येथील रिव्हर व्ह्यू सिटीजवळून पिराच्या मंदिरापासून फुरसुंगी व पुढे वडकीच्या दिशेने जाणार आहे. या रिंगरोडमध्ये कदमवाकवस्ती येथील शेकडो शेतकऱ्यांची अंदाजे १७ एकर जमीन (६७५८१.५४ चौ.मी.) या रस्त्यामध्ये जाणार आहे.