महामार्गांवरील कोंडीमुळे लालपरी, ई-शिवाई, शिवनेरीला फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:18 IST2025-10-28T16:18:18+5:302025-10-28T16:18:59+5:30
- ई-शिवाई, शिवनेरीचे चार्जिंग डाऊन; पाच-तास प्रवासाला लागताहेत सात ते आठ

महामार्गांवरील कोंडीमुळे लालपरी, ई-शिवाई, शिवनेरीला फटका
पुणे : प्रवाशांची प्रचंड गर्दी, गाड्यांच्या रांगा, महामार्गावरील वाहतूककोंडीने परतीच्या प्रवासासाठी पुणे, मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एरव्ही सोलापूरहून पुण्याला पोहोचण्यासाठी पाच तास लागतात. परंतु, महामार्गावरील कोंडीमुळे या प्रवासासाठी तब्बल सात ते आठ तास लागत आहेत. यामुळे सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, लातूर, बीड व इतर आगारांतून पुणे, मुंबईला जाणाऱ्या लालपरी, ई-शिवाई, शिवनेरीला नियोजित वेळेत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर नागरिक परत त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले आहेत. यामुळे बसस्थानक, खासगी ट्रॅव्हल्स आणि रेल्वेला प्रचंड गर्दी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून पुणे, मुंबई या प्रमुख शहरांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. परंतु, दिवाळीत चारचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे. परिणामी, फेरी पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे ई-शिवाई, शिवनेरीचे चार्जिंग डाऊन होते. त्याचा परिणाम पुढील फेरीवर होत आहे.
पुणे एसटी विभागातून दादर, बोरिवली, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड, सातारा या शहरांदरम्यान ई-शिवाई, शिवनेरी बस धावतात. कोंडीमुळे नियोजित फेरीपेक्षा जादा फेऱ्यांचे नियोजन एसटी प्रशासनाकडून करण्यात येते. दरम्यान, दिवाळीमुळे गावी, पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. परंतु, वाहतूक कोंडीत अडकल्याने ई-शिवाई, शिवनेरीच्या बॅटरी (चार्जिंग) डाऊन होत आहेत. याचा परिणाम पुढील फेऱ्यांवर होत आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
नोकरीवर वेळेत जाण्यासाठी धडपड अन...
तीन, चार दिवसांच्या सुटीनंतर पुण्यात नोकरी करणारे माघारी निघाले आहेत. त्यामुळे सर्व बसेसना प्रचंड गर्दी आहे. शिवाय आगाऊ आरक्षणही फुल्ल झालेले असते. त्यामुळे अनेकजण चारचाकी घेऊन गेलेले पुणे, मुंबईचे नोकरदार कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रात्रीच निघत आहेत. परंतु, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महामार्गावर कोंडीमुळे नोकरदारांना वेळेत पोहोचण्यासाठी धडपडत यावे लागत आहे.
चार ते पाच किलोमीटर अंतरासाठी दीड ते दोन तास
छत्रपती संभाजीनगर - पुणे, नाशिक - पुणे, कोल्हापूर - पुणे, सोलापूर - पुणे, मुंबई मार्गावर वाहतूक कोंडीने चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे चार ते पाच किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागल्याचे काही वाहनधारकांनी सांगितले.
...इथे होते वाहतूक कोंडी
नाशिकवरून येताना संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, राजगुरूनगर, चाकण औद्योगिक क्षेत्र, मोशी, भोसरी. कोल्हापूरवरून येताना तासवडे टोलनाका, कराड, सातारा, कात्रज नवीन बोगदा, नवले पूल, खेड शिवापूर टोलनाका परिसर, सोलापूरहून येताना लोणी काळभोर, उरळी कांचन, यवत. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून येताना शिरूर बायपास, रांजणगाव, कारेगाव, शिक्रापूर, सणवाडी, काेरेगाव, वाघोली, चंदननगर या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे प्रमुख मार्गांवर दोन ते चार किलोमीटरची रांग लागत आहेत.
पुण्यातून धावणाऱ्या ई-बसेसची आकडेवारी :
शहर - ई-बसेस संख्या
ठाणे - २०
दादर - २०
बोरिवली - २०
सोलापूर - १०
छत्रपती संभाजीनगर - १०
कोल्हापूर - १०
नाशिक - १०
बीड - ५
सातारा - ५
बारामती- ५