जर्सी वासरांचे जीव धोक्यात; इंदापूर तालुक्यातील विदारक चित्र; नेमकं कारण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:10 IST2025-09-12T12:09:38+5:302025-09-12T12:10:08+5:30

- वाहनांच्या धडकेने मरणे, वन्यप्राण्यांचा भक्ष्य बनणे किंवा सर्पदंशाला बळी पडणे यासारख्या दुर्दैवी अंताला सामोरे जावे लागत आहे.

pune news Jersey calves lives in danger a heartbreaking picture from Indapur taluka | जर्सी वासरांचे जीव धोक्यात; इंदापूर तालुक्यातील विदारक चित्र; नेमकं कारण काय ?

जर्सी वासरांचे जीव धोक्यात; इंदापूर तालुक्यातील विदारक चित्र; नेमकं कारण काय ?

इंदापूर : इंदापूर तालुक्यात जर्सी गायींच्या नवजात वासरांना बेवारस अवस्थेत डोंगराळ भागात सोडण्याचे क्रूर चित्र समोर येत आहे. या असहाय्य वासरांना भुकेने व्याकूळ होऊन भटकताना वाहनांच्या धडकेने मरणे, वन्यप्राण्यांचा भक्ष्य बनणे किंवा सर्पदंशाला बळी पडणे यासारख्या दुर्दैवी अंताला सामोरे जावे लागत आहे. यामुळे प्राणीसंवर्धन आणि मानवतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

देशी गायी आणि जर्सी गायींचा उपयोग प्रामुख्याने दुधासाठी होतो, तर बैलांचा उपयोग शेतीच्या कामांसाठी केला जातो. मात्र, जर्सी वासरांचा कोणताही उपयोग होत नसल्याने, त्यांना दुधात वाटेकरी होऊ नये म्हणून जन्मल्यानंतर लगेच डोंगराळ भागात सोडले जाते. ही वासरे अजून दूध पिण्याच्या अवस्थेत असतात आणि चारा खाऊ शकत नाहीत.

परिणामी, भुकेने तडफडताना त्यांना हिंस्र वन्यप्राण्यांचा सामना करावा लागतो. इंदापूर तालुक्यातील ६४८.१६ हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारीत आहे, यामध्ये ३६४.५३ हेक्टर राखीव वन आणि २८३.६३ हेक्टर संरक्षित वनक्षेत्राचा समावेश आहे. या वनक्षेत्रात तरस, लांडगा, कोल्हा, जंगली मांजरे आणि विषारी सर्प आढळतात. अनेक गावांना लागून असलेल्या या जंगलात जर्सी वासरे सोडली जातात, जिथे त्यांना वन्यप्राण्यांचा किंवा सर्पदंशाचा धोका असतो.

या अमानवीय प्रकाराला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेऊन वासरांच्या संरक्षणासाठी यंत्रणा उभारावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे. तसेच, प्राणीमित्रांनी गावपातळीवर सामूहिक गोठे स्थापन करून वासरांना दत्तक घ्यावे आणि कृत्रिम दूध पावडरच्या साहाय्याने त्यांचे संगोपन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: pune news Jersey calves lives in danger a heartbreaking picture from Indapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.