दोन जातींच्या दोन वेगळ्या समित्या नेमण्याची गरज काय? शरद पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:21 IST2025-09-17T17:19:57+5:302025-09-17T17:21:51+5:30

राजकारण न करता सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.

pune news is there a need to appoint two separate committees for two castes Sharad Pawar questions | दोन जातींच्या दोन वेगळ्या समित्या नेमण्याची गरज काय? शरद पवारांचा सवाल

दोन जातींच्या दोन वेगळ्या समित्या नेमण्याची गरज काय? शरद पवारांचा सवाल

 पुणे: राज्यात दोन समाजांच्या दोन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्याची आवश्यकता होती का? असा प्रश्न करत ज्येष्ठ नेते आरक्षणाच्या मागण्यांवर राज्यकर्त्यांकडून घेतल्या जात असलेल्या भूमिकांवर नाराजी व्यक्त केली. राजकारण न करता सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आलेल्या पवार यांनी माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. त्यावेळी राज्यातील सामाजिक वातावरण बिघडले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, बंजारा समाजाने त्यांचा आदिवासी वर्गात समावेश व्हावा म्हणून मोर्चा काढला. दुसऱ्याच दिवशी आदिवासी समाजाचा मोर्चा झाला. दोन समाजांमध्ये कारण नसताना वातावरण वेगळे व्हायला लागले. आता सरकारने दोन समित्या नेमल्या. एक एका जातीची एक दुसऱ्या जातीची. यात एकजण दुसऱ्याचा विचार करणार नाही. असे करण्याची, दोन वेगवेगळ्या समित्या नेमण्याची गरज होती का? सामाजिक वीण दुबळी होत आहे.

राजकारण न करता सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न होणे महत्वाचे आहे. हैद्राबाद गॅझेटविषयी कधीच वाचले नव्हते. तो भाग महाराष्ट्रात नव्हता. त्याच्या खोलात आम्ही कधी गेलो नाही. प्रत्येक जातीची वेगळी मागणी असेल तर ऐक्य कसे होईल? असा प्रश्न पवार यांनी केला.



सोलापूरात रस्त्यावरून पाणी वाहिले असे कधी ऐकले, पाहिले नव्हते. इकडे लोणी काळभोरमध्येही घरांमध्ये पाणी घुसले. उसाचे व अन्य पिकाचेही नुकसान झाले आहे. चाऱ्या असतात त्या बुजवल्या. पाणी वाहून जायचा सोर्स बुजवला. किल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे की ताबडतोब पंचनामे सुरू करा.  केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक तरतूद होत असते. आप त्ती निधी  मिळत  असतो.  सरकारकडे मागणी केली आहे. त्यांनी प्रक्रिया गतीमान केल्याचे क‌‌ळवले आहे असे पवार यांनी सांगितले.

अलमट्टी धरणाची उंची वाढवली जात आहे याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, याबाबत सरकारने लवकर तेथील सरकारबरोबर काही करायला हवे. नाहीतर सोलापूर कोल्हापूर भागात भयंकर स्थिती निर्माण होईल. साखर व्यवसायातील कामगारांचा कोल्हापूरला मेळावा आहे, तिथे जाणार आहे, त्यावेळी याची माहिती घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. एकदा झाले, दुसऱ्यांदाही तेच झाले, त्यामुळे आता न्यायालयाने घेतलेला निर्णय चांगलाच आहे असे ते म्हणाले.

Web Title: pune news is there a need to appoint two separate committees for two castes Sharad Pawar questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.