कात्रज प्राणी संग्रहालय तलावातील मलनिस्सारण प्रकल्पात अनियमितता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:42 IST2025-12-10T11:41:05+5:302025-12-10T11:42:37+5:30
- मोठा भ्रष्टाचार झाल्याचा नागरिकांचा आरोप

कात्रज प्राणी संग्रहालय तलावातील मलनिस्सारण प्रकल्पात अनियमितता
संतोष गाजरे
कात्रज : राजीव गांधी प्राणी संग्रहालय–कात्रज तलावात मलनिस्सारण प्रकल्प (एसटीपी) योग्य पद्धतीने चालू नसल्याने प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळत आहे. यामुळे लेक टाऊन व परिसरात दुर्गंधी, जलप्रदूषण आणि डासांचा प्रचंड प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. यामुळे लेक टाऊन सोसायटी व आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप लेक टाऊन सोसायटीतील नागरिक करत आहेत.
लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी लेक टाऊन सोसायटीला भेट दिली तेव्हा तलावात सांडपाणी सरळ मिसळले जाणार नाही. ते आधी एसटीपीमध्ये प्रक्रिया करून, पर्यावरणाच्या दृष्टीने शुद्ध आणि सुरक्षित असल्यासच तलावात सोडावे असे सांगण्यात आले होते, परंतु आजही तलावात थेट किंवा प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळण्याची समस्या कायम आहे.
नागरिकांनी महापालिका अधिकारी, विभागप्रमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना अनेक वेळा भेटून पाठपुरावा केला तरी देखील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. उलट जलपर्णी व गाळ काढण्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप लेक टाऊनमधील नागरिक करत आहेत. कात्रज तलावातील जलपर्णी आणि गाळ काढण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला असून जलपर्णी पुन्हा त्याच प्रमाणात वाढत आहे. तलावाची स्थिती बदलत नाही. दुर्गंधी कमी होण्याऐवजी वाढत आहे. म्हणजेच पूर्ण कामाची गुणवत्ता शंकास्पद आहे.
त्याचबरोबर केलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी आणि गुणवत्ता तपासणी राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) च्या पर्यावरण मानकांनुसार केली गेली आहे का? जर नसेल तर हा थेट निष्काळजीपणा आणि सार्वजनिक निधीचा अपव्यय आहे. एनजीटी पर्यावरण मानकांचे पालन कोण करणार? जबाबदारी कोणाची?
तलावात सोडले जाणारे पाणी एनजीटीच्या मापदंडांनुसार आहे की नाही याची पारदर्शक तपासणी आवश्यक आहे. याची जबाबदारी कोणाची? तपासणी कोण करत आहे? अहवाल कधी प्रसिद्ध होणार? चूक झाल्यास किंवा झाली असल्यास कारवाई कोणावर होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तीन वर्षांसाठी मुदत
कात्रज तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी प्रक्रिया करून तलावात सोडण्यात यावे. यासाठी महापालिकेकडून १५ व्या वित्त आयोगामार्फत आठ कोटी निधी सांडपाण्याची प्रक्रियेसाठी उभारण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने मैलावाहिनी दुरुस्ती करणे, नवीन सहाशे मीटर मैलावाहिनी टाकणे व दोन दशलक्ष क्षमतेचा मलनि:सारण प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. २०२३ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली असून याची मुदत देखभाल एसटीपी सुरु झाल्यापासून तीन वर्षांसाठी देण्यात आली आहे.
मागील १० वर्षांपासून दुर्गंधीचा त्रास आहेच. परंतु या आठ दिवसांमध्ये तीव्र रसायन आणि ॲॅसिडची दुर्गंधी येत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना महिला भगिनींना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक जण श्वासनाच्या आजाराने त्रस्त आहेत. घरातील भांड्याचा रंग बदलला आहे, तर शरीरावर काय परिणाम होत असतील. १२७८ फ्लॅट जवळपास ५००० लोकसंख्या असलेली आमची सोसायटी आहे. महापालिकेला वार्षिक कोट्यवधीचा कर आम्ही नियमित भरतो, परंतु अनेक वेळ तक्रारी करून ऑनलाइन मेल करून अधिकाऱ्यांकडून उडवा-उडवीची उतारे आणि आश्वासने येतात. दुर्गंधी लवकर कमी न झाल्यास मोठे जनआंदोलन करण्यात येईल. - संजय साळी, लेक टाऊन जागृत नागरिक संघ
कात्रज तलावाच्या एसटीपीमध्ये जेएसपीएम संतोषनगर नाला आणि कात्रज गाव, कात्रज वसाहत नाल्याचे मैलापाणी एसटीपीला जोडणे टेंडरनुसार आवश्यक आहे. असे असताना आजपर्यंत कात्रज गाव आणि कात्रज वसाहतीतून येणारे मैला पाणी थेट तलावात मिश्रित होते. या तफावतीमुळे आणि अनियमिततेमुळे दुर्गंधी कशी कमी होईल. नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. आजूबाजूच्या नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. - महेश धूत, गजराज सोशल फाउंडेशन
कात्रजला दोन एमएलडी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र आहे तो ट्रायल रनमध्ये आहे. आतापर्यंत नाल्यांमधून येणारे पाणी हे कात्रज तलावात जात होते. त्यामुळे मैला साचत असे. पण या प्रकल्पामुळे पाणी शुद्ध होऊन तलावात सोडण्यात येते. येत्या महिनाभरात कात्रज तलावात येणारे पूर्ण दूषित पाणी एसटीपी प्रकल्पाला जोडणार आहोत. याबद्दल टिप्पणी व संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात येईल. - जगदीश खानोरे, मुख्य अभियंता, मलनिस्सारण विभाग, महापालिका
कात्रज गाव आणि कात्रज वसाहतचे मैला पाणी सध्या थेट तलावात जात आहे. ते बंद पाइपलाइनद्वारे ड्रेनेजला जोडणार आहोत. जेएसपीएम व संतोषनगरकडून येणाऱ्या मैला पाणी एसटीपीला जोडले आहे. -अतुल कडू, मलनिस्सारण विभाग