Video : इंद्रायणी विषारी, प्रशासन निरुत्तर..! नागरिकांचा संताप शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:01 IST2025-12-12T11:59:17+5:302025-12-12T12:01:39+5:30
- गरुडस्तंभ ते भक्त पुंडलिक मंदिर घाट परिसरामध्ये मृत माशांचा ढीग

Video : इंद्रायणी विषारी, प्रशासन निरुत्तर..! नागरिकांचा संताप शिगेला
आळंदी: राज्याचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीतील इंद्रायणी नदीचे प्रदूषण आता अत्यंत गंभीर स्तरावर पोहोचले असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गरुडस्तंभ ते भक्त पुंडलिक मंदिर घाट परिसरामध्ये अनेक मासे मृतावस्थेत तरंगताना दिसले. काही मृत मासे तर नदीच्या पायऱ्यांवरही पडून होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. इंद्रायणी नदीतील हे दृश्य वाढत्या प्रदूषणाच्या धोक्याची घंटा देत आहे.
इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणाबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक चिंता व्यक्त करत होते. स्थानिक रहिवाशांच्या मते, नदीकाठच्या गावांमधून येणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि काही औद्योगिक युनिटमधून थेट नदीत सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी हे या प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत. तीर्थक्षेत्र असल्याने दररोज हजारो भाविक या नदीत स्नान करतात आणि आचमनही करतात. मात्र, नदीतील या विषारी परिस्थितीमुळे भाविकांच्या आरोग्यविषयक धोक्यातही वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी मृत माशांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेत तत्काळ कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
या गंभीर घटनेवर इंद्रायणी सेवा फाउंडेशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फाउंडेशनचे विठ्ठल शिंदे म्हणाले, ‘नदीतील वाढत्या प्रदूषणामुळेच मासे मोठ्या प्रमाणात मरत आहेत. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. मग याला जबाबदार कोण? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासन नेमके काय करत आहे? शिंदे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले असून, या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक समाजसेवी संस्था आणि नागरिकांनी केली आहे.
पवित्र इंद्रायणी नदीचे पावित्र्य आणि जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आणणाऱ्या या गंभीर प्रदूषणाकडे प्रशासन कधी लक्ष देणार, असा संतप्त सवाल भाविक आणि नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने तत्काळ या घटनेची दखल घेऊन नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
वारंवार आश्वासने, शून्य कृती
इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी नेत्यांनी ‘शब्दांची नदी’ केली. मात्र प्रत्यक्षात ही नदी कोरडी राहिली जात आहे. नदी शुद्धीकरणासाठी तातडीने मोठा निधी मंजूर करू आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विशेष योजना राबवू. औद्योगिक कंपन्यांवर कठोर कारवाई करून, रासायनिक सांडपाणी नदीत सोडणे थांबवले जाईल. आळंदीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एस.टी.पी. प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू होईल. नियमित तपासणी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी अनेक आश्वासने संबंधित मंत्र्यांकडून देण्यात आली आहेत. पण वारंवार दिलेल्या आश्वासनांवर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
आळंदीतील इंद्रायणी नदीला पवित्र नदी मानले जाते. आळंदीत आलेले हजारो भाविक याच पाण्यात स्नान करतात. आत्तापर्यंत मंत्र्यांनी दिलेली सगळी आश्वासने पाण्यात बुडाली आहेत. आता जर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर आम्ही सर्व नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू - निसार सय्यद, स्थानिक नागरिक