शहरात फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ; ‘इन्फ्लुएन्झा’ विषाणूचा प्रादुर्भाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 20:12 IST2025-08-21T20:11:31+5:302025-08-21T20:12:14+5:30
दीर्घ फ्लू झालेल्या रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागत आहे, असे वैद्यकीयतज्ज्ञांनी सांगितले

शहरात फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ; ‘इन्फ्लुएन्झा’ विषाणूचा प्रादुर्भाव
पुणे : शहरात बदलत्या हवामानामुळे ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यामध्ये विशेषतः ‘इन्फ्लुएन्झा’ विषाणूंच्या (एच१ एन१, एच ३ एन २) संसर्गाचे प्रमाण जास्त आढळत असून, काही रुग्णांमध्ये ‘दीर्घ फ्लू’ची लक्षणे दिसून येत आहेत.
दीर्घ फ्लू झालेल्या रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागत आहे, असे वैद्यकीयतज्ज्ञांनी सांगितले. शहरात यंदा मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. जूनमध्ये काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले. मात्र, ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाचे प्रमाण वाढले असून यामुळे फ्लू व संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एच ३ एन २ विषाणूच्या रुग्णांना हंगामी फ्लूपेक्षा बरे होण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. साधारण फ्लूमध्ये रुग्ण ३ ते ४ दिवसांत बरा होतो, परंतु एच ३ एन २च्या रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी ३ ते ४ आठवडे लागू शकतात. या विषाणूचा संसर्ग सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये आढळून येत आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक व आधीपासून असलेल्या दीर्घकालीन आजारांनी (डायबेटीस, हृदयविकार, दमा) त्रस्त रुग्णांना बरे होण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. काही रुग्णांमध्ये न्यूमोनियाची लक्षणेदेखील दिसून येत आहेत.
फ्लूची प्रमुख लक्षणे : ताप, घशात खवखव, खोकला, अंगदुखी, धाप लागणे, थकवा, काहींमध्ये न्यूमोनिया, संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. हवामानातील बदलामुळे फक्त फ्लूच नव्हे, तर डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात बाहेरील अन्न व दूषित पाणी सेवन केल्याने टायफॉइडचे रुग्णही वाढत आहेत. नागरिकांनी पावसाळ्यात जास्तीत जास्त काळजी घ्यावी, असे वैद्यकीयतज्ज्ञांनी सांगितले.
नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, उघड्यावरचे व अस्वच्छ अन्न टाळावे. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःहून औषधे घेऊ नयेत. सद्यस्थितीत ताप व न्यूमोनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. मात्र, दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. विशेषतः ज्येष्ठांना बरे होण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने तापाची लक्षणे दिसताच नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. हरिदास प्रसाद, विभागप्रमुख, औषध वैद्यकशास्त्र विभाग, ससून.