मराठी शाळेत पट वगैरे चालणार नाही , पट म्हणाल तर आम्ही तुम्हाला चितपट करू-साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:24 IST2025-10-30T18:24:12+5:302025-10-30T18:24:59+5:30
- सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मत व्यक्त केले.

मराठी शाळेत पट वगैरे चालणार नाही , पट म्हणाल तर आम्ही तुम्हाला चितपट करू-साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील
पुणे :मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. मराठी शाळेत पट वगैरे चालणार नाही , पट म्हणाल तर आम्ही तुम्हाला चितपट करू. ज्या वर्गात एक विद्यार्थी असेल तरी त्या एका विद्यार्थ्यासाठी देखील एक शिक्षक नेमला पाहिजे. कारण मराठी टिकली पाहिजे, असे मत सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी गुरुवारी (दि.30) व्यक्त केले. भारतात ज्या उत्तमोत्तम भाषा आहेत, ज्या वाचल्या जातात, ज्या भाषेमध्ये अधिक ग्रंथ खपतात, ज्या भाषेतील साहित्य गांभीर्याने घेतले जाते, त्यात बंगाली, मल्याळम आणि मराठी भाषेचा समावेश आहे. सहा राज्यामध्ये जवळपास हिंदी भाषिक वास्तव्यास असूनही, मराठीचा व्यवहार हिंदीपेक्षा मोठा आहे, असेही ते म्हणाले.
आपटे रस्त्यावरील सेंट्रल पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या पुणे बुक फेअर आणि मराठी साहित्य मेळ्याचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त विभागीय आयुक्त स्वाती देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, प्रसारभारतीचे इंद्रजित बागल, पुणे बुक फेअरचे संयोजक पी. एन. आर. राजन आदी उपस्थित होते.
मी स्वतः; जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आहे, आम्ही पाच विद्यार्थी होतो. त्याकाळात जर पट संख्येचा नियम लावला असता तर मला शाळाच शिकता आली नसती. एखाद-दुसरा विद्यार्थी असला तरी तुकडी पाहिजे , कोण जाणे त्यातील एखादा उद्याचा ज्ञानेश्वर, तुकाराम असेल. मराठी भाषेवर प्रेम करायला शिकले पाहिजे, असे सांगून पाटील म्हणाले,
मी मराठी भाषा भवनाची संकल्पना मांडली आहे, जुन्या काळात गावातल्या शाळा असायच्या. तशीच बाजारगावाच्या ठिकाणी मराठी भाषेची भव्य इमारत असली पाहिजे. अनेक गावामध्ये ज्येष्ठ दाम्पत्यांना जमीन दान करायची असते. अशाप्रकारे लोकवर्गणीतून हे मराठी भवन उभारण्याची इच्छा आहे. गावागावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी मराठी भवन व्हावे, तिथे ग्रंथालय असेल, ज्येष्ठ नागरिकांची संस्कृतीसाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल तिथे ते चर्चा करतील. हे प्रयोग झाले पाहिजे. मराठी भाषेची आणि साहित्याची परंपरा मोठी आहे.
अध्यक्षीय भाषणात प्रा. जोशी म्हणाले, आजच्या समाजाला डिजिटल जगातून बाहेर पडण्याची गरज आहे. वाचनातील एकारलेपण आपण टाळले पाहिजे. आजच्या घडीला खरी गरज आहे ग्रामीण भागात पुस्तक जत्रा आयोजित करण्याची. गावगावातील ग्रंथे प्रदर्शने बंद झालेली आहेत. ती पुन्हा सुरु करण्याची गरज आहे. गावागावांमध्ये पुस्तके पोचवली पाहिजेत. पॉप संस्कृती वाढताना शास्त्रीय संगीताचे काय होईल, असे बोलले गेले. पण, आज सगळ्यांनाच शास्त्रीय संगीत आवडते, तसे चित्र नक्कीच वाचन क्षेत्रातही पाहायला मिळेल.
पुणे बुक फेअर हे आपटे रस्त्यावरील सेंट्रल पार्क येथे रविवारपर्यंत (दि.2 नोव्हेंबर) सकाळी अकरा ते रात्री आठ यावेळेत सुरु राहणार आहे. शिरीष चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले आणि वि. दा. पिंगळे यांनी आभार मानले.