अवैध पार्किंग, व्यावसायिकांची अतिक्रमणे अन् पोलिसांच्या दुर्लक्षामुळे कोंडीचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:20 IST2025-09-12T11:18:20+5:302025-09-12T11:20:01+5:30

- बाजीराव आणि शिवाजी रस्ता अडकला वाहतूक कोंडीच्या गर्तेत

pune news Illegal parking, encroachments by businessmen and police negligence lead to traffic congestion | अवैध पार्किंग, व्यावसायिकांची अतिक्रमणे अन् पोलिसांच्या दुर्लक्षामुळे कोंडीचे ग्रहण

अवैध पार्किंग, व्यावसायिकांची अतिक्रमणे अन् पोलिसांच्या दुर्लक्षामुळे कोंडीचे ग्रहण

- अंबादास गवंडी

पुणे :
वाहनचालकांचा निष्काळजीपणा, जागा मिळेल त्याठिकाणी पार्किंग करणे, एकेरी वाहतूक असताना विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, व्यावसायिकांचे अतिक्रमण आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बाजीराव रस्ता, शिवाजी रस्त्यावर सकाळी, दुपारी शाळा सुटल्यानंतर आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीचा मनस्ताप पुणेकरांना सर्रास करावा लागतो; परंतु वाहतूक पोलिस मात्र याकडे डोळेझाक करत आहेत.

मध्यवर्ती पुण्यात ये-जा करण्यासाठी बाजीराव आणि शिवाजी रस्ता महत्त्वाचे आहेत. यामुळे या दोन्ही रस्त्यांवरून दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. परंतु दोन्ही बाजूला जागा मिळेल त्याठिकाणी बेकायदा वाहनांची पार्किंग केली जाते. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होते. शिवाय चिंचेची तालीमकडून बाजीराव रस्त्यावरील टेलिफोन भवनकडे येण्यास ‘नो एंट्री’ आहे. तरीही दिवसरात्र खुलेआम वाहनांची ये-जा सुरू असते.

यामुळे कित्येक वेळा अपघातदेखील झाले आहेत; परंतु समोरच वाहतूक पोलिस उभे असताना वाहनचालकांवर कारवाई होत नाही. दुसरीकडे शिवाजी रस्त्यावर श्रीमंत दगडूशेठ मंदिरापासून मंडई मुख्य रस्त्यावर विक्रेते बसलेले असतात. जवळच पोलिस ठाणे आहे. तरीही कोणावरही कारवाई होत नाही. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. शिवाय शनिवार आणि रविवार या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे दिव्य कसरत आहे. शहराची मुख्य रस्ता असूनदेखील वाहतूक कोंडीचा मात्र बट्याबोळ झाला आहे.

शनिवार, रविवार कॅब चालकांमुळे कोंडी

शिवाजी रस्त्यावरील मंगला टॉकीज, शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती ते मंडई ते गाडीखाना त्याचप्रमाणे बाजीराव रोड रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान, शनिपार चौक, अ. ब. चौक ते शनिवार वाडा या रस्त्यावर प्रत्येक शनिवार, रविवार, शासकीय सुट्यांचे दिवस त्याचप्रमाणे चतुर्थी व सणाच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होते. तसेच सुट्यांच्या दिवशी उपनगरातील, इतर शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. दरम्यान, मध्य भागात मोठ्या प्रमाणात कॅब येतात. त्यांना पार्किंगची सोय नसल्याने मुख्य रस्त्यावर थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. एखादी दुर्घटना घडले तर अशावेळी रुग्णवाहिका असो वा अग्निशमन यंत्रणा वाहतूक कोंडीमुळे सदर ठिकाणी वेळेत पोहोचू शकणार नाही, अशा भयानक अवस्थेत दोन्ही रस्ते अडकले आहेत. 

वाहतूक शाखा, मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बाजीराव रस्ता, शिवाजी रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या नियोजनासाठी शहर वाहतूक शाखा आणि पुणे मनपा अधिकाऱ्यांनी संयुक्त नियोजन करून आराखडा करणे गरजेचे आहे. तसेच लालमहाल चौक, बुधवार चौक, दत्त मंदिर चौकात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रणासाठी कायम पोलिस असणे आवश्यक आहे; परंतु कधी पोलिस असतात, तर कधी गायब असतात. जवळच फरासखाना व विश्रामबाग पोलिस ठाणे असूनदेखील वाहतुकीची परिस्थिती दयनीय बनली आहे. त्यामुळे पुणेकरांना नित्याचीच ढकलगाडीसारखे या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो.

व्यावसायिकांची मुजोरी

या दोन्ही रस्त्यांवर अनधिकृतरीत्या व्यावसायिक दुकाने थाटली आहेत. अनेकदा मालाची चढउतार सुरू असते. त्यामुळे तासन् तास रस्त्यावर वाहने थांबवितात. त्यामुळे कोंडीत भर पडते. शिवाय या दोन्ही रस्त्यांवर एसटी बसला ये-जा करण्यासाठी परवानगी नाही. तरीही दिवसरात्र कधीही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी आणि कर्नाटक परिवहनची एसटी खुलेआम धावतात. वाहतुकीला बंदी असताना कारवाई होणे अपेक्षित आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.

कोंडी कमी होण्यासाठी या गोष्टी होणे अपेक्षित आहे...

- रस्त्यावर टेम्पो, ट्रक, मालगाडी पार्किंग करणे बंद करणे.

- नो एन्ट्रीमध्ये येणाऱ्यांवर कडक कारवाई करणे.

- व्यावसायिकांची अतिक्रमण काढणे आवश्यक आहे.

- फूटपाथ मोकळे करणे.

- अवजड वाहने, मालवाहतुकीवर बंदी घालणे.

- मुख्य रस्त्याशेजारी बसणाऱ्या विक्रेत्यांना बसू देऊ नये.

Web Title: pune news Illegal parking, encroachments by businessmen and police negligence lead to traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.