मतदान यंत्रे नादुरुस्त, तर बॅलेट पेपरवरच घ्या निवडणूक; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:08 IST2025-09-19T16:04:21+5:302025-09-19T16:08:39+5:30
पुणे : एकट्या पुणे विभागात तब्बल साडेचार हजार मतदान यंत्रे नादुरुस्त असल्याचे प्रशासकीय यंत्रणांकडून सांगितले जात आहे. एकीकडे लोकसभेतील ...

मतदान यंत्रे नादुरुस्त, तर बॅलेट पेपरवरच घ्या निवडणूक; काँग्रेसची मागणी
पुणे : एकट्या पुणे विभागात तब्बल साडेचार हजार मतदान यंत्रे नादुरुस्त असल्याचे प्रशासकीय यंत्रणांकडून सांगितले जात आहे. एकीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देशभरातील मतचोरी उघडकीस आणत आहेत, तर दुसरीकडे आयोग नादुरुस्त यंत्रांवर मतदान घेण्याचे जाहीर करत आहे. त्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतचिठ्ठीद्वारेच घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले की, आयोगाकडूनच मतदान यंत्रांच्या नादुरुस्तीचा मुद्दा पुढे केला जात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट (मतदान केल्याची पावती) देता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या दोन्ही गोष्टी मतदान प्रक्रियेतील पारदर्शीपणाला धक्का देणाऱ्या आहेत. त्यामुळे अशी नादुरुस्त यंत्रे वापरण्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतचिठ्ठीने घेतल्यास मतदारांचा विश्वास परत मिळवल्याचे समाधान आयोगाला मिळेल व मतदारांनाही आपल्या मतांची चोरी होत नाही, याची खात्री पटेल.
सलग ४ ते ५ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झालेली नाही. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला कायमच निवडणुकीतील पराभवाची भीती वाटत असते. त्यामुळेच ते आयोगाच्या माध्यमातून स्वत:ला हवे त्याप्रमाणे निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, नादुरुस्त यंत्रे वापरून मतदान घेण्याला काँग्रेसचा कायमच विरोध असेल, असे जोशी यांनी सांगितले. त्यातूनही आयोगाने मनमानी करण्याचा प्रयत्न केल्यास वेळप्रसंगी याविरोधात न्यायालयात दाद मागू, असा इशाराही त्यांनी दिला. यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.