एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा, गाठ शेतकऱ्यांशी; राजू शेट्टींचा सज्जड इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 21:22 IST2025-07-23T21:21:15+5:302025-07-23T21:22:15+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांचा साखर आयुक्तांना सज्जड इशारा

pune news If FRP is torn to pieces, remember, it will be a fight with farmers: Raju Shetty | एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा, गाठ शेतकऱ्यांशी; राजू शेट्टींचा सज्जड इशारा

एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा, गाठ शेतकऱ्यांशी; राजू शेट्टींचा सज्जड इशारा

पुणे : ‘केंद्र सरकारच्या पत्राचा आधार घेऊन शेतकऱ्यांना साखरेच्या उताऱ्यानुसार एफआरपी देण्याबाबत काही कारखाने घाट घालत आहेत. त्यामुळे साखर नियंत्रण आदेशाचा भंग होत आहे. मात्र, एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा. गाठ शेतकऱ्यांशी आहे, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना दिला.

शेट्टी यांनी बुधवारी (दि. २३) साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एफआरपीचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला होता. तो उच्च न्यायालयाने हाणून पाडला. मात्र, आता पुन्हा केंद्र सरकारच्या १० जुलैच्या पत्राआडून तसा प्रकार सुरू झाला आहे. कारखान्यांनी पंधरा दिवसांच्या आता एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, ती तुकड्यांत दिली जात आहे. साखर संघाकडून एफआरपीची मोडतोड करण्याचा प्रयत्न होत आहे. या पत्रासंदर्भात संबंधित विभागाच्या सचिवांशी दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. त्यावेळी तसे कोणतेही परिपत्रक काढण्यात आलेले नाही, ते केवळ सूचना वजा पत्र आहे, असे मला सांगण्यात आले. यापूर्वी राज्य सरकारने तसा निर्णय घेतला होता. त्याला उच्च न्यायालयात जाऊन आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने राज्य शासनाचा निर्णय रद्द ठरविला होता.

सुपेकरप्रकरणी करणार याचिका दाखल

राज्यात घोटाळे करणाऱ्यांना ‘क्लीन चिट’ देणारे विद्यापीठ निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. या कुलगुरूंमुळे काहीही होत नाही, हे सर्व मंत्र्यांना पटले आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासारखा नादान कृषिमंत्री पाहिला नाही. त्यांना कृषिमंत्री पदातून मुक्त करून चोवीस तास रमी खेळू द्यावे, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली. तर कारागृहातील साहित्य खरेदीतील संशयित जालिंदर सुपेकर यांना क्लीन चिट दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: pune news If FRP is torn to pieces, remember, it will be a fight with farmers: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.