तू घरातून निघून जा,नाहीतर..;पतीकडून पत्नीचा मानसिक छळ; सात जणांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:30 IST2025-07-22T13:29:09+5:302025-07-22T13:30:16+5:30
- या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तू घरातून निघून जा,नाहीतर..;पतीकडून पत्नीचा मानसिक छळ; सात जणांविरोधात गुन्हा
पुणे : तू मला अपयशी आहेस, तुझ्यामुळे माझी किडनी खराब झाली आहे. तू घरातून निघून जा, नाहीतर तुला मारून टाकेल,अशा धमक्या देत पतीकडून सातत्याने पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुरसुंगी परिसरातील ३७ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीकडून गेल्या काही महिन्यांपासून तिच्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार होत होते. घरगुती वादातून पतीने तिच्यावर वेळोवेळी शिवीगाळ केली, धमक्या दिल्या आणि मारहाण केली. "माझ्या आजारासाठी तू जबाबदार आहेस," असे म्हणून तिच्यावर दोष टाकून तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तसेच, माहेरून पैसे आणावेत, या कारणावरून सासू, सासरे, नणंद व इतर नातेवाईकांनी संगनमताने तिच्यावर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ केला. तिला सतत अपमानास्पद वागणूक दिली जात होती.
या तक्रारीवरून फुरसुंगी पोलिसांनी पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.