धनकवडी :पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (कात्रज) ला 'अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज’, असे नामकरण करण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळाने सर्वानुमते घेतला आहे. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने सहकार क्षेत्रात शोककळा पसरली असून, ही हानी सहकार चळवळीच्या दृष्टीने आणि पुणे जिल्ह्यातील दूध संघासाठी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना संघाने व्यक्त केली आहे.
पवार यांनी पुणे जिल्ह्यातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. संघाच्या वार्षिक सभेला ते उपस्थित राहिले होते आणि संस्थेची कार्यप्रणाली, विस्तार आणि प्रशासनिक पातळीवरील आवश्यक समन्वयासाठी त्यांचे पाठबळ लाभले, असे संघाकडून नमूद करण्यात आले. विशेष म्हणजे पवार कुटुंबाचे सहकार चळवळीला आणि संघाच्या विविध प्रयत्नांना सातत्याने सहकार्य मिळत आले, अशी भूमिका संघाकडून मांडण्यात आली आहे.
संघाला बळकट करणे, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्थात्मक उभारणीला प्राधान्य देणे आणि सहकारी संस्थांना सक्षम बनवण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून संघाला मिळालेले दादांचे पाठबळ आम्ही कायम स्मरणात ठेवू, अशी भावना संघातील पदाधिकारी व संचालकांनी व्यक्त केली. संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्निल ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या सभेत हा ठराव मांडण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष तानाजी जगताप, संचालक गोपाळराव अण्णा म्हस्के, विष्णू हिंगे, बाळासाहेब नेवाळे, बाळसाहेब खिलारी, केशरताई पवार, भगवान पासलकर, दिलीप थोपटे, राहुल दिवेकर, भाऊसाहेब देवाडे, अरुण चांभारे, कालिदास गोपाळघरे, निखिल तांबे, लताताई गोपाळे, चंद्रकांत भिंगारे, आदी उपस्थित होते. सर्व संचालकांनी या निर्णयाला एकमताने मंजुरी दिली.
संघाने स्पष्ट केले की, हा निर्णय केवळ नाव बदलण्यापुरता मर्यादित नसून, सहकार क्षेत्रासाठी केलेल्या योगदानाचा सन्मान आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या नेतृत्वाची कायमस्वरूपी स्मृती जपण्याचा प्रयत्न आहे. संघाच्या कार्यात मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान संस्थेच्या नावातून कायम राहावा, असा उद्देश या नामकरणामागे आहे. नामकरणाबाबतची पुढील औपचारिक प्रशासकीय प्रक्रिया आणि आवश्यक परवानग्या/नोंदी पूर्ण करण्याची कार्यवाही संबंधित पातळीवर करण्यात येणार असल्याचेही संघाने नमूद केले.
Web Summary : Katraj Dairy will now be known as 'Ajitdada Pawar Pune District Cooperative Milk Producers Association Katraj'. The decision honors Pawar's contribution to the cooperative sector and his guidance to the dairy. It aims to memorialize his support and inspire future generations, ensuring his legacy within the institution.
Web Summary : कात्रज डेयरी अब 'अजितदादा पवार पुणे जिला सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज' के नाम से जानी जाएगी। यह निर्णय पवार के सहकारी क्षेत्र में योगदान और डेयरी को उनके मार्गदर्शन के सम्मान में लिया गया है। इसका उद्देश्य उनके समर्थन को यादगार बनाना और भावी पीढ़ियों को प्रेरित करना है, ताकि संस्था में उनकी विरासत बनी रहे।