सह्याद्री हॉस्पिटलमधील लिव्हर ट्रान्सप्लांट मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 14:55 IST2025-08-27T14:54:26+5:302025-08-27T14:55:09+5:30

- चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश; प्रत्यारोपण प्रक्रिया तात्पुरती स्थगित

pune news high-level inquiry into liver transplant deaths at Sahyadri Hospital | सह्याद्री हॉस्पिटलमधील लिव्हर ट्रान्सप्लांट मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी

सह्याद्री हॉस्पिटलमधील लिव्हर ट्रान्सप्लांट मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी

पुणे : डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झालेल्या लिव्हर प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी राज्य आरोग्य विभागाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. चार आठवड्यांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत.

संचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. २६) ऑगस्ट रोजी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ अंतर्गत राज्य सल्लागार समितीची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या बैठकीला समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झालेल्या लिव्हर प्रत्यारोपणातील मृत्यूबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर समितीने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना करून चौकशी अहवाल चार आठवड्यांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याबरोबरच चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटलमधील लिव्हर प्रत्यारोपण प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सेवा उपसंचालक व (माअप्र) पुणे मंडळाचे विभागीय समुचित प्राधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या स्वाक्षरीने निर्णय जाहीर करण्यात आला. हॉस्पिटल प्रशासनाकडून आरोग्य अधिकाऱ्यांकडून नोटीस प्राप्त झाल्याचे व प्रकरणाच्या चौकशीसाठी सहकार्य करत असल्याचे सांगण्यात आले. याबरोबरच संपूर्ण चौकशी होईपर्यंत लिव्हिंग लिव्हर ट्रान्सप्लांट कार्यक्रम तात्पुरता स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

नेमके प्रकरण काय?

डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात १३ ऑगस्ट रोजी बापू कोमकर यांच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी कमिनी कोमकर यांनी यासाठी यकृताचा एक भाग दान केला होता. मात्र, शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन दिवसांत म्हणजे १५ ऑगस्ट रोजी बापू कोमकर यांचे निधन झाले. त्यानंतर आठवड्याभराने, २२ ऑगस्ट रोजी कमिनी यांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइकांनी डॉक्टर्सवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

Web Title: pune news high-level inquiry into liver transplant deaths at Sahyadri Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.