पुणे-नाशिक महामार्गाला समांतर रेल्वेमार्गासाठी शासनाने पुढाकार घ्यावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 09:55 IST2025-12-10T09:54:04+5:302025-12-10T09:55:16+5:30
पुणे, चाकण औद्योगिक वसाहत, अहमदनगर, पुणतांबा, शिर्डी, नाशिक या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती संसदेत दिली होती.

पुणे-नाशिक महामार्गाला समांतर रेल्वेमार्गासाठी शासनाने पुढाकार घ्यावा
राजगुरुनगर : पुणे-नाशिक महामार्गाला समांतर जाणाऱ्या रेल्वेमार्गाची मंजुरी मिळण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार व राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांनी संसदेत खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना खोडद (ता. जुन्नर) येथील जीएमआरटी प्रकल्पामुळे पुणे ते नाशिकला चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेरमार्गे जाणारा प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्यात आला असून पुणे, चाकण औद्योगिक वसाहत, अहमदनगर, पुणतांबा, शिर्डी, नाशिक या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती संसदेत दिली होती.
पुणे-नाशिक महामार्गाला समांतर रेल्वेमार्ग होणे हे उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजक यांच्या हिताचे आहे. पूर्वीचा रेल्वेमार्ग व नवीन रेल्वेमार्ग यांतील अंतरात मोठी तफावत आहे. शिर्डीमार्गे असलेल्या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे अंतर ३०० कि.मी.पेक्षा जास्त आहे; त्यामुळे तेवढेच अंतर पुणे-कल्याणमार्गे नाशिक आहे, तर हा रेल्वेमार्ग कशासाठी ? अहमदनगरहून दौंडमार्गे पुणे हा जुना रेल्वेमार्ग अस्तित्वात असताना फक्त चाकण औद्योगिक वसाहतीसाठी नवीन मार्गाची आखणी होत असेल तर जीएमआरटी प्रकल्पाला अडथळा होणार नाही, याची उपाययोजना करून पुणे-नाशिक महामार्गास समांतर रेल्वेमार्गच सयुक्तिक ठरेल.
जीएमआरटी प्रकल्प भागात बोगदा वा इतर प्रकारे रेल्वेमार्ग केला तर प्रकल्प खर्चात मोठी वाढ होईल व त्याची जबाबदारी केंद्राने की राज्याने घ्यायची यामुळे प्रकल्पाचा मार्गच बदलला, अशी माहिती प्रसारमाध्यमांनीही दिली आहे, असे टाव्हरे यांनी नमूद केले आहे. पुणे-नाशिक जिल्ह्यांतील आम नागरिक, उद्योजक तसेच शेतमाल व औद्योगिक वाहतुकीसाठी जुन्या मार्गालाच मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यातून या भागाच्या विकासाला चालना मिळेल.
महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने घेऊन केंद्र सरकारने रद्द केलेल्या पुणे-नाशिक या जुन्या रेल्वेमार्लागाच मान्यता मिळण्यासाठी सध्या प्रस्तावित केलेला शिर्डी, अहमदनगरमार्गे पुणे हा मार्ग रद्द करण्यासाठी पुढाकार घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी अशोकराव टाव्हरे यांनी निवेदनात केली आहे