प्रवाशांसाठी खुश खबर...! पुणे स्टेशन ते वाघोली रातराणी बस धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 20:40 IST2025-10-30T20:40:00+5:302025-10-30T20:40:15+5:30
- यामुळे पीएमपीकडून पुणे स्टेशन ते वाघोलीदरम्यान रातराणी बस सुरू करण्यात येणार

प्रवाशांसाठी खुश खबर...! पुणे स्टेशन ते वाघोली रातराणी बस धावणार
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) प्रवाशांच्या सोयीसाठी सहा मार्गांवर रातराणी सेवा सुरू केली आहे. याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे येत्या मंगळवारी पुणे स्टेशन ते वाघोलीदरम्यान सातव्या मार्गावर रातराणी बस सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे स्टेशनवरून वाघोली, चंदननगर, येरवडा या भागांत जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचे होणार आहे.
नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त पुण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी पुणे स्टेशनवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखात आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपूर्वी पीएमपीकडून कात्रज ते शिवाजीनगर बसस्थानक, पुणे स्टेशन ते एनडीए गेट, हडपसर ते स्वारगेट, हडपसर ते पुणे स्टेशन, पुणे स्टेशन ते निगडी, पुणे स्टेशन ते कात्रज या सहा मार्गांवर रातराणी पीएमपी बस सुरू आहे.
या सर्व बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे पीएमपीकडून पुणे स्टेशन ते वाघोलीदरम्यान रातराणी बस सुरू करण्यात येणार आहे. याचा फायदा येरवडा, वाघोली, चंदननगर, विमाननगर या भागात जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.