आली... गवर आली.. सोनपावली आली..; गौराईचे जल्लोषात स्वागत; आज होणार गौरीपूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:30 IST2025-09-01T12:29:33+5:302025-09-01T12:30:06+5:30
- गणरायाच्या आगमनानंतर आता घरोघरी गौरींचे आवाहन; महिलांनी पारंपरिक वेशभूषा, दागदागिने परिधान करत केली पूजा आली

आली... गवर आली.. सोनपावली आली..; गौराईचे जल्लोषात स्वागत; आज होणार गौरीपूजन
पुणे : शहरासह उपनगरात रविवारी (दि.३१) गौराईचे थाटामाटात आगमन झाले. सकाळपासूनच महिलांनी पूजा-अर्चेची लगबग सुरू केली होती. अंगणात रांगोळ्या, दारावर तोरणे, मंदिरे व घरांचे कोपरे फुलांनी सजवले होते. महिलांनी पारंपरिक नऊवारी, पैठणी, दागदागिने परिधान करत गौराईचे स्वागत केले.
गौराईच्या आगमनावेळी महिलांनी आरती, फुलोरा, नैवेद्य दाखवून त्यांचे स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने फराळाचे पदार्थ लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळे, पुरणपोळी यांचा नैवेद्य दाखवला गेला. माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईचे स्वागत घरातील सर्वांनी मानाने केले. प्रवेशद्वारापासूनच रांगोळीत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवून गौराईचे आगमन मंगलमय करण्यात आले.
गौरींच्या मूर्ती किंवा पाटावर बसवलेल्या मूर्तीसारख्या प्रतीकांना फुलांनी, वेलींनी सजवले गेले. सोन्याचे दागिने, रेशमी साड्या, चंदन-हळदीचा श्रृंगार यामुळे गौराईचे रूप उजळून निघाले होते. काही ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन 'आली गवर आली सोनपावली आली' अशी गाणी म्हणत गौराईचे स्वागत केले. भाद्रपद शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करण्याची परंपरा आहे. यंदा अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन झाले आहे.
गौरींचे विसर्जन मंगळवारी होणार
ज्येष्ठ नक्षत्रावर सोमवारी (दि. १) गौरीपूजन होणार आहे. कुटुंबाच्या आरोग्य, सुख-समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी महिलांनी गौराईना अन्न, वस्त्र, अलंकार अर्पण करावेत, अशी परंपरा आहे, गौरींचे विसर्जन मंगळवारी (दि. २) मूळ नक्षत्रावर होणार आहे. रात्री ९.५७वाजेपर्यंत विसर्जनाची वेळ निश्चित करण्यात आली असून, त्या आधी महिलांनी गौराईना निरोप देण्याची तयारी केली आहे.