वारजेत दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली;अन्य आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:28 IST2025-07-18T11:27:43+5:302025-07-18T11:28:11+5:30
एका जागरूक नागरिकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली.

वारजेत दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली;अन्य आरोपी फरार
पुणे : वारजे परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळीतील सोनू कपूरसिंग टाक या आरोपीला वारजे पोलिसांनी पाठलाग करत पकडले. ही संपूर्ण कारवाई सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ही घटना गुरुवारी पहाटे ३:५५ वाजता वारजेतील म्हाडा कॉलनीजवळ घडली. टाक गँगच्या सदस्यांनी धारदार शस्त्रांसह जीपने दरोड्याची योजना आखली होती.
एका जागरूक नागरिकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली. पाठलाग करून सोनू टाकला अटक करण्यात पोलिसांना यश आले, तर इतर दोघे फरार झाले. सोनूकडून २ लाख ५० हजार रुपयांची चारचाकी, ३ लाख २५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने, दहा हजार रुपयांचे घरफोडीचे सामान आणि प्राणघातक हत्यारे असा ५ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी शेलार यांनी फिर्याद दिली. सोनू टाक याच्यावर पुणे, हडपसर, नेरूळ, सांगवी, चतु:शृंगी, देहूरोड आणि हिंजवडी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सोनू टाकसह त्याच्या साथीदारांविरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रणजीत मोहिते करत आहेत.