आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गणेश तोटेने पटकाविले कांस्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:05 IST2025-12-12T12:04:32+5:302025-12-12T12:05:33+5:30
स्पर्धेच्या आठवडाभर आधीच वडिलांचे निधन होऊनही देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न मनाशी जपलेल्या गणेशने दाखविलेली जिद्द आणि चिकाटी अत्यंत अनुकरणीय आणि अभिमानास्पद आहे.

आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गणेश तोटेने पटकाविले कांस्यपदक
सासवड : तुर्की येथे सुरू असलेल्या आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मंगळवारी (दि ९) भारताच्या गणेश तोटे याने दमदार कामगिरी सादर करत पुरुषांच्या १०५ किलोग्रॅम वजनगटात कांस्यपदकाची कमाई केली. स्क्वॉटमध्ये ३३२.५ किलोग्रॅम, डेडलिफ्टमध्ये २६५ किलोग्रॅम आणि बेंचप्रेसमध्ये २२० किलोग्रॅम असे एकूण ८१७.५ किलोग्रॅम वजन उचलत त्याने भारताचा तिरंगा गौरवाने फडकाविला.
रायगड जिल्ह्यातील भिंगारी गावचा रहिवासी असलेला गणेश सध्या सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचालित वाघिरे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. स्पर्धेच्या प्रारंभी स्क्वॉट प्रकारात ३३२.५ किलोग्रॅम वजन उचलत तो द्वितीय स्थानी होता; मात्र बेंचप्रेस प्रकारात इराणच्या आलाफ बेह बहाणी हुसेनीने आघाडी घेत त्याला तृतीय स्थानी ढकलले. इराणी खेळाडूने सातत्य राखल्याने रौप्यपदकाची झुंज थोडक्यात हुकली. मशिन्तो सेर्गी या न्यूट्रल खेळाडूने तिन्ही प्रकारात उत्तुंग कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविले.
स्पर्धेच्या आठवडाभर आधीच वडिलांचे निधन होऊनही देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न मनाशी जपलेल्या गणेशने दाखविलेली जिद्द आणि चिकाटी अत्यंत अनुकरणीय आणि अभिमानास्पद आहे. आपल्या यशाचे श्रेय गणेशने आई-वडील, कुटुंबीय, प्रशिक्षक विशाल मुळे व प्रमोद पवार, सहकारी खेळाडू, तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. प्रीतम ओव्हाळ यांना दिले.
गणेशच्या या देदीप्यमान यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, संस्था क्रीडा अधिकारी श्याम भोसले आणि प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी गणेश भारतात परतल्यानंतर त्याचे जंगी स्वागत करण्याचा मनोदय व्यक्त केला.