गुळूंचवाडीमध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन, सुरक्षिततेसाठी चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 10:31 IST2025-11-08T10:31:13+5:302025-11-08T10:31:34+5:30
देवकरमळा येथे दोन दिवसांपूर्वी विनोद देवकर आणि जालिंदर देवकर यांच्या चारचाकी गाडीला बिबट्या आडवा आला होता, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुळूंचवाडीमध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन, सुरक्षिततेसाठी चिंता वाढली
बेल्हा : गुळूंचवाडी (ता. जुन्नर) येथे काल रात्री बिबट्याचे दर्शन घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. हभप गौरव महाराज कर्डिले कीर्तनसेवा पूर्ण करून घरी परतत असताना येथील केवटमळा परिसरात त्यांच्या चारचाकी गाडीला बिबट्या अचानक आडवा आला, ज्यामुळे त्यांना प्रचंड धक्का बसला. तसेच, येथील देवकरमळा येथे दोन दिवसांपूर्वी विनोद देवकर आणि जालिंदर देवकर यांच्या चारचाकी गाडीला बिबट्या आडवा आला होता, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात बिबट्याचे वारंवार पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन रोजच होत आहे आणि सर्वत्र बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. या परिसरातील ग्रामस्थ मुलांना शाळेत आपल्या दुचाकीवरून घेऊन जात आहेत. रात्रीच्या वेळी कोणीही एकटे बाहेर पडत नाही. वनखात्याने या देवकरमळा येथे पिंजरा लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष आग्रे यांनी केली आहे.