आयटी कंपन्यांच्या मनमानीला आळा घालावा;फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजची कामगार मंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 15:55 IST2025-09-21T15:55:09+5:302025-09-21T15:55:32+5:30
आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात, सक्तीचे राजीनामे, तसेच कायदेशीर प्रक्रिया न पाळता नोकऱ्या काढून घेण्याचे प्रकार वाढले

आयटी कंपन्यांच्या मनमानीला आळा घालावा;फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजची कामगार मंत्र्यांकडे मागणी
पिंपरी : आयटी क्षेत्रातील वाढत्या अन्यायाविरोधात फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज या संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने मंत्रालयात नुकतीच कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर व गृह सचिवांची भेट घेतली. आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात, सक्तीचे राजीनामे, तसेच कायदेशीर प्रक्रिया न पाळता नोकऱ्या काढून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. आयटी कंपन्यांच्या या मनमानी कारभाराला आळा घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
फोरमच्यावतीने आयटी कर्मचाऱ्यांवरील अन्यायाचा पाढाच मंत्री फुंडकर यांच्यासमोर मांडला. यामध्ये हिंजवडी येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससह (टीसीएस) इतर आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे सक्तीचे राजीनामे, पार्श्वभूमी तपासणीच्या नावाखाली दबाव, अंतिम तडजोडीत होणारे अन्याय, आवश्यक कागदपत्रे न देणे अशा तक्रारींचा समावेश होता. कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या राजीनाम्यांवर पोलिस तक्रारी नोंदविण्याची गरज असल्याचेही फोरमने स्पष्ट केले.
कामगार मंत्री फुंडकर यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले. गृह सचिवांनीदेखील सक्तीच्या राजीनाम्यांबाबत पोलिस कारवाईसंदर्भात ठोस कार्यवाही होईल, असे फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी सांगितले. तसेच ही केवळ सुरुवात आहे. आयटी कर्मचाऱ्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील, असा निर्धार फोरमच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.