अखेर पोलिस भरती प्रक्रियेला मिळाला मुहूर्त, आजपासून होणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:43 IST2025-10-28T18:41:07+5:302025-10-28T18:43:14+5:30
- २०२२ पासून २०२५ पर्यंत वयोमर्यादा संपलेल्या उमेदवरांनाही एक विशेष संधी

अखेर पोलिस भरती प्रक्रियेला मिळाला मुहूर्त, आजपासून होणार सुरुवात
बारामती :महाराष्ट्र पोलिस दलामध्ये १५ हजारांपेक्षा जास्त पोलिस पदांची भरती प्रक्रिया आजपासून (दि. २९ ऑक्टोबर) सुरू होत आहे. यामध्ये पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, बँन्डस्मन, कारागृह शिपाई आणि एसआरपीएफ या पदांचा सामावेश आहे. याबाबत पोलिस भरतीच्या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सन २०२२ पासून २०२५ पर्यंत वयोमर्यादा संपलेल्या उमेदवरांनाही एक विशेष संधी देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी १८ हजारांपेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया पार पडली होती. याही वर्षी १५ हजारांपेक्षा जास्त पदांची ही मोठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे, त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पोलिस शिपाई पदासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत एक महिना असणार आहे.
यापूर्वी २ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र पोलिस भरती पोर्टलवर ७ ऑक्टोबरपासून भरतीप्रक्रिया जाहीर करण्यात आली हाेती. मात्र, अचानक हा मजकूर पोर्टलवरून हटविण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात गेल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर या वृत्ताची दखल घेत पुन्हा पोलिस भरती जाहीर करण्यात आली आहे.
पोलिस शिपाई पदासाठी होणाऱ्या या भरतीप्रक्रियेमध्ये प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार एकास दहा प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेतसुद्धा किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण १५० गुणांमधून केली जाणार आहे.
अर्जांची संख्या, स्पर्धा जास्त असणार
या वर्षीच्या पोलिस भरतीमध्ये वय वाढ देण्यात आली आहे. यामध्ये सन २०२२ पासून २०२५ पर्यंत वयोमर्यादा संपलेल्या उमेदवरांनाही एक विशेष संधी दिली आहे. त्यामुळे यंदा भरतीसाठी अर्जांची संख्या, स्पर्धा ही जास्त असणार आहे. पोलिस भरती फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदतीच्या तारखेच्या ३० नोव्हेंबरच्या आतील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर काढले जाणारे कागदपत्र भरतीप्रकियेसाठी चालत नाहीत. याची उमेदवारांनी विशेष दखल घेणे गरजेचे असल्याचे सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले.