पुणे महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 17:15 IST2025-10-04T17:14:28+5:302025-10-04T17:15:55+5:30
- इच्छुक उमेदवारांना काही अंशी दिलासा तर हरकत घेणाऱ्या काहींचे समाधान देखील झाले आहे.

पुणे महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर
पुणे - आगामी निवडणुकीसाठी पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. प्रारूप प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणावर हरकती आल्याने निवडणूक आयोगाने या हरकतींचा विचार करून काही प्रभागांमध्ये बदल केले असून प्रभागांची नावेही बदलली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांना काही अंशी दिलासा तर हरकत घेणाऱ्या काहींचे समाधान देखील झाले आहे.
अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक 18 वानवडी - साळुंके विहार या प्रभागाचा शिंदे वस्तीचा भाग प्रभाग क्रमांक 14 कोरेगाव पार्क - घोरपडी- मुंढवा या प्रभागाला जोडण्यात आला आहे. प्रारूप रचनेमध्ये शिंदे वस्ती चे रस्त्याने विभाजन झाले होते. प्रभाग क्रमांक 14 कोरेगाव पार्क - घोरपडी - मुंढवा चा मगरपट्टा सिटी रस्त्याच्या समोरील भाग हा प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी- माळवाडी- वैदुवाडी ला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 20 बिबवेवाडी - महेश सोसायटी या प्रभागाचे नावही बदलले असून बिबवेवाडी- शंकर महाराज मठ असे करण्यात आले आहे.
या प्रभागातील के. के.मार्केट येथील पुण्याई नगर हा भाग प्रभाग क्रमांक 38 बालाजी नगर - आंबेगाव - कात्रज या प्रभागाला जोडण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 34 नऱ्हे - वडगाव बुद्रुक - आंबेगावचा दाभाडी हा भाग पाच सदस्य प्रभाग 38 बालाजीनगर - आंबेगाव- कात्रज या प्रभागाला ला जोडण्यात आला आहे. तसेच कोळेवाडी ,जांभूळवाडी हा भाग देखील प्रभाग क्रमांक 38 बालाजी नगर- आंबेगाव - कात्रजला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 38 बालाजी नगर - आंबेगाव - कात्रजमधील सुखसागर नगरचा भाग प्रभाग 39 अप्पर सुपर - इंदिरानगर ला जोडण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 15 मांजरी बुद्रुक- केशवनगर- साडे सतरा नळी मधील थिटे वस्ती चा भाग प्रभाग क्रमांक 4 खराडी - वाघोलीला जोडला आहे. विशेष असे की या प्रभागातून सर्वाधिक हरकती आल्या होत्या.
या प्रभागांमध्ये झालेत बदल
महापालिकेच्या 165 नगरसेवकांसाठीच्या 41 प्रभागाच्या प्रारूपावर पाच हजार 922 हरकती आल्या होत्या. यापैकी 4,524 हरकती अमान्य करण्यात आल्या तर 1329 हरकती पूर्णतः व 69 हरकती अंशतः मान्य करण्यात आल्या प्रभाग क्रमांक 1,4,14,15,17,18,20,24,27,34,38 व 39 या प्रभागांमध्ये बदल झाले आहेत.