तळेगाव ढमढेरेतील जगताप वस्ती परिसरात मादी बिबट्या जेरबंद; नागरिकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 20:57 IST2025-12-16T20:56:51+5:302025-12-16T20:57:12+5:30
शिरूर वनविभागाच्या वतीने तळेगाव ढमढेरे–जगताप वस्ती येथे शिवराज जगताप यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता.

तळेगाव ढमढेरेतील जगताप वस्ती परिसरात मादी बिबट्या जेरबंद; नागरिकांना दिलासा
तळेगाव ढमढेरे - येथील जगताप वस्ती व चौधरी वस्ती परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून काही पशुधनावरही हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक मादी प्रवर्गातील बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
अधिकच्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जगताप वस्ती व चौधरी वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर शिरूर वनविभागाच्या वतीने तळेगाव ढमढेरे–जगताप वस्ती येथे शिवराज जगताप यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवारी सकाळच्या सुमारास शेजारील शेतकरी गजानन जगताप शेतात गेले,असता त्यांना पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले. याची माहिती तातडीने शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र वनअधिकारी प्रमोद पाटील, वन्यजीव बचाव पथकाचे शेरखान शेख, वैभव निकाळजे, अमोल कुसाळकर व परमेश्वर दहीरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अमोल ढमढेरे, वैभव ढमढेरे, पोपट जगताप, गजानन जगताप, बालाजी पसारे, धनराज सोनटक्के, दादाभाऊ भुजबळ, माजी उपसरपंच विजय ढमढेरे आदींच्या उपस्थितीत बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले. पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या अंदाजे अडीच वर्षांचा असून तो मादी प्रवर्गातील असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली. सदर बिबट्याची पुढील तपासणी करून माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे.दरम्यान ढमढेरे वस्ती, जगताप वस्ती, साळू माळी वस्ती व चौधरी वस्ती परिसरात अजूनही अंदाजे पाच ते सहा बिबटे असल्याची शक्यता असल्याने वनविभागाने तातडीने आणखी पिंजरे लावावेत, अशी मागणी ॲड. अजिंक्य ढमढेरे यांनी केली आहे.